कडकडीत बंद; ठिकठिकाणी दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 12:24 AM2018-01-03T00:24:28+5:302018-01-03T00:24:44+5:30
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील घटनेचे मंगळवारी जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले. जमावाने खाजगी वाहनांना लक्ष्य करीत बसवर दगडफेक केली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील घटनेचे मंगळवारी जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले. जमावाने खाजगी वाहनांना लक्ष्य करीत बसवर दगडफेक केली. नूतन वसाहत भागात जमावाने एक खाजगीवाहन जाळले, तर अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या वाहनावर दगडफेक केली. दुपारनंतर बसच्या सर्व फे-या रद्द करण्यात आल्या होत्या. दगडफेकीत १५ बसेसचे नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सायंकाळपर्यंत शहरातील बहुतांश दुकाने बंद राहिली तर रस्त्यावरही शुकशुकाट दिसून आला.
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी काही ठिकाणी शांततेच्या मार्गाने रास्ता रोको करण्यात आला. मात्र, दुपारी जमावाने बसेससह खाजगी वाहनांना लक्ष्य करीत दगडफेक केली. सकाळी अकराच्या सुमारास जालना-सिंदखेडराजा रस्त्यावरील नंदापूर फाट्यावर जमावाने रास्ता रोको करून दगडफेक केली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती.
रामनगर रस्त्यावरही जमावाने टायर पेटवून देत रास्ता रोको केला. मान देऊळगाव येथेही दोन बसेससह खाजगी वाहनांवर दगडफेक झाली. जालना-औरंगाबाद रस्त्यावरील चंदनझिरा परिसरात बसवर दगडफेकीची घटना घडली. शहरातील भोकरदन नाका परिसरात काही युवकांनी जालना- औरंगाबाद बसवर दगडफेक केली.
कन्हैयानगर रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला. दुपारी साडेबाराच्या सुमारास तरुणांच्या एक गटाने रस्त्यावर उतरून वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. नूतन वसाहत भागात वाहनांवरील दगडफेकीत मोठे नुकसान झाले. युवकांनी एका खाजगी वाहनाला आग लावली. तर गांधी चमन चौक, टाऊन हॉल परिसरात जमावाने घोषणाबाजी करीत दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. फळांच्या हातगाड्या उलथून टाकल्या. भाजीपाला विक्रेत्यांना हुसकावून लावले. त्यामुळे बहुतांश व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली.
दरम्यान, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर हे फौजफाट्यासह रस्त्यावर उतरले. नूतन वसाहत भागात जमावाला आवरत असताना काहींनी अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या वाहनावर दगडफेक करून नुकसान केले. यात एका पोलीस कर्मचा-याच्या डोक्याला जखम झाली.
परतूरमध्येही दगडफेक
परतूर शहरात सकाळी वाटूर फाटा येथे शिवणगिरीकडे जाणा-या बसवर जमावाने दगडफेक केली. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी दुपारनंतर आगार प्रमुख दिगंबर जाधव यांनी जोखीम घेत काही मार्गावर बस सोडून विद्यार्थ्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था केली. शहरात सर्वत्र शांतता असल्याचे पोलीस निरीक्षक आर. टी. रेंगे यांनी सांगितले.
भोकरदन शहरात निषेध मोर्चा
भीमा कोरेगाव येथील घटनेचा मंगळवारी भोकरदन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून उपविभागीय कार्यालयापर्यंत शांततेत मोर्चा काढून निषेध करण्यात आला. उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात नगरसेवक दीपक बोर्डे, माजी नगराध्यक्षा रेखा पगारे, गणेश सांबळे, सुभाष साळवे, कैलास पांचगे, सुरेश पैठणे, निर्मलाताई भिसे, ईश्वर पारखे, सुरेश बनकर, युवराज पगारे, प्रकाश सुरडकर, गंगाधर कांबळे, रमेश पगारे, विनोद जाधव, सोनू पगारे, शामराव साळवे, शिवाल मिसाळ, प्रवीण आढावे आदींनी सहभाग घेतला. यावेळी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी नगराध्यक्षा आशा माळी, नगरसेवक शेख कदिर, संध्या शर्मा, राहुल ठाकूर, रणवीरसिंह देशमुख, संतोष अन्नदाते, शेख जफर आदींनी उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर वसावे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन
शहागड : दलित संघटनांच्या वतीने बुधवारी शहागड बंदची हाक देण्यात आली आहे. पोलीस व व्यापारी महासंघाच्या अध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भीमा कोरेगाव येथील घटना ही निषेधार्ह बाब आहे.
बुधवारी सकाळी दहा ते बारा वाजेदरम्यान समाज मंदिर ते शहागड बसस्थानक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले. निवेदनावर विलास म्हस्के, अॅड. अतुल कांबळे, भाऊसाहेब जोगदंड, राजेंद्र वारे, अतुल जोगदंड, संतोष येटाळे, सुरेश येटाळे, विठ्ठल शेळके, दीपक जोगदंड, धम्मदीप येटाळे आदी पदाधिका-यांच्या सह्या आहेत.
आज आष्टी बंद
आष्टी : आष्टी बाजारपेठ बुधवारी बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात आष्टी पोलीस ठाण्याचे सपोनि विनोद इज्जपवार यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर शेकडो आंबेडकरीय अनुयायींच्या स्वाक्षºया आहेत.