अनुदानाच्या याद्या अपलोड करण्यास टाळाटाळ करणाऱ्या १४ कृषी सहाय्यकांवर गुन्हा

By दिपक ढोले  | Published: August 26, 2023 05:27 PM2023-08-26T17:27:50+5:302023-08-26T17:28:09+5:30

या कृषी सहायकांना महसूल प्रशासनाने नोटिसा बजावून खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यांनी समाधानकारक खुलासा सादर केला नाही.

Crime against 14 agricultural assistants for refusing to upload subsidy lists | अनुदानाच्या याद्या अपलोड करण्यास टाळाटाळ करणाऱ्या १४ कृषी सहाय्यकांवर गुन्हा

अनुदानाच्या याद्या अपलोड करण्यास टाळाटाळ करणाऱ्या १४ कृषी सहाय्यकांवर गुन्हा

googlenewsNext

जालना : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून त्या पोर्टलवर अपलोड करण्याच्या कामास टाळाटाळ करणाऱ्या जालना तालुक्यातील १४ गावातील कृषी सहायकांवर तालुका जालना पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. 

२०२२ मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी मदत जाहीर केली होती. त्यानुसार कृषी सहायकांना शेतकऱ्यांचे बँक खाते, आधार क्रमांक व अन्य माहिती असलेल्या याद्या तयार करून शासनाच्या पोर्टवरील विहीत वेळेत अपलोड करण्याचे निर्देश महसूल प्रशासनाने दिले होते. या संदर्भात जून व जुलै महिन्यात आपत्ती व्यवस्थापनांतर्गत वारंवार झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत जालना तालुक्यातील १४ कृषी सहायकांनी १५ गावांमधील शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टवलवर अपलोड केल्या नसल्याची समोर आले.

या कृषी सहायकांना महसूल प्रशासनाने नोटिसा बजावून खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यांनी समाधानकारक खुलासा सादर केला नाही. त्यामुळे त्यांना शिस्तभंगाच्या कार्यवाहीची नोटीस दिली होती. त्यानंतरही संबंधित कृषी सहायकांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड केल्याच नाही. त्यामुळे तहसीलदारांच्या आदेशानंतर नायब तहसीलदार दिलीप शेनफड सोनवणे यांनी तालुका पोलिस ठाण्यात १४ कृषी सहायकांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक जनार्धन शेवाळे हे करीत आहेत.

या कृषी सहाय्यकांवर दाखल झाला गुन्हा
आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेल्या कृषी सहायकांमध्ये एम. एस. घोरपडे (हिस्वन बु.), ए. एन. सोनवलकर (चितळीपुतळी), व्ही. के. पुंड (रेवगाव), जी. एल. ढवळे (वडीवाडी, ममदाबाद), एस. एस. काकडे (नागापूर), जे. के. तायडे (उमरी), बी. जे. कदम (पळसखेडा), एन. जी. राठोड (कवठा), यु. बी. बंगाळे (माळेगाव खु.), यु. डी. ख़ांडेभराड (थार), जी. ए. अंभोरे (खणेपुरी), व्ही. आर. कुलकर्णी (तांदुळवाडी बु.), एस. के. भुतेकर (रायगव्हाण), बी. एल. वाघ (अंबेडकरवाडी) यांचा समावेश आहे.

Web Title: Crime against 14 agricultural assistants for refusing to upload subsidy lists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.