भूखंड घोटाळ्याप्रकरणी २१ जणांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 01:15 AM2020-02-13T01:15:11+5:302020-02-13T01:17:39+5:30
जमीन कायदेशीर परवानगी न घेता आणि शासनाला भरावा लागणारा नजराना न भरता परस्पर प्लॉटिंग करून विक्रीस काढल्याप्रकरणी २१ जणांविरूध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरात यापूर्वीच अनेक भूखंड घोटाळे मोठ्या प्रमाणावर गाजले आहेत. शहरातील गोल्डन ज्युबिली शाळा परिसरातील सर्वे क्रमांक १७३ मध्ये चार एकर इनामी जमीन होती. ही जमीन कायदेशीर परवानगी न घेता आणि शासनाला भरावा लागणारा नजराना न भरता परस्पर प्लॉटिंग करून विक्रीस काढल्याप्रकरणी २१ जणांविरूध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्योजक अरूण अग्रवाल यांनी याबाबत तक्रार दिली असून, बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची आणि नागरिकांची दिशाभूल केल्याचे म्हटले आहे.
शहरात यापूर्वी वेगवेगळ्या भागांमधील भूखंड घोटाळा प्रकरणांमध्ये यंत्रणांचा चुकीचा वापर करून बनावट पीआरकार्ड आणि अन्य कागदपत्रे तयार करून भूखंड विक्री करण्यात आले आहेत.
याही प्रकरणांमध्ये असाच प्रकार यंत्रणेतील वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांची दिशाभूल करून जमीन विक्रीचे प्रकरण पुढे आले आहे.
या प्रकरणी अरूण अग्रवाल यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यात लेआऊट मंजूर नसताना पीआरकार्ड तयार करणे तसेच इनामी जमीन असताना ती विक्री करण्यासाठी शासनाकडून हवी असलेली परवानगी न घेणे, नजराणा न भरणे इ. मु्द्यांचा उहापोह अरूण अग्रवाल यांनी तक्रारीत केला आहे. पोलिसांच्या पुढील तपासाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना विचारले असला आजच तक्रार दाखल झाली आहे. त्यात आम्ही आणखी दोन्ही बाजूंची माहिती घेऊन चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले.
अग्रवाल यांच्या तक्रारीवरून रंगनाथ अप्पा काटकर, प्रकाश रंगनाथ काटकर, लक्ष्मण तुकारामअप्पा काटकर, नारायण लक्ष्मण काटकर, कैलास लक्ष्मणअप्पा काटकर, शिवा लक्ष्मणअप्पा काटकर, निरंजन रंगनाथअप्पा काटकर, केसरबाई रंगनाथअप्पा काटकर, अमोल प्रकाशअप्पा काटकर, भास्कर तात्याराव खुळे, सुमनबाई पाराजी अप्पा औरंगे, सुमनबाई लक्ष्मण अप्पा औरंगे, गंगा अशोक नामदे, सुनीता रंगनाथ परळकर, हर्ष सुनील बोरा, श्रीया दीपक गेलडा, सचिन भानुदास मिसाळ, रश्मी विनोद भरतीया, संतोष पन्नालाल करवा यांच्यासह इतरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.