जालन्यात दिंडी मार्गाचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 07:38 PM2018-05-08T19:38:26+5:302018-05-08T19:38:26+5:30
महामार्गात जाणाऱ्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी परतवाडी शिवारातील रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम बंद पाडले. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरा आष्टी पोलीस ठाण्यात चार शेतकऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी (जि.जालना) : परतूर तालुक्यातील आष्टी परिसरात शेगाव-पंढरपूर या दिंडी मार्गाचे काम सुरू आहे. महामार्गात जाणाऱ्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी परतवाडी शिवारातील रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम बंद पाडले. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरा आष्टी पोलीस ठाण्यात चार शेतकऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शेतकरी आणि प्रशासनात संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
परतूर ते माजलगाव दरम्यान शेगाव-पंढरपूर या राज्य महामार्ग ५४८ चे काम सुरू आहे. हे काम हैदराबाद येथील कंपनीस शासनाने दिले आहे. यासाठी परतवाडी शिवारात रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. महामार्गात जाणाऱ्या मोबदल्यासाठी सदर काम स्थानिक शेतकरी बंद पाडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सोमवार सकाळी ११ च्या सुमारास अभियंता अतुल अरूण कोटेचा कर्मचारी व पोलिसांसोबत परतवाडी शिवारात रस्ते कामाची पाहणी करत असताना, परतवाडी येथील सोनाजी आढे, नारायण मोती आढे, पांडुरंग सोपा आढे, वसुरुमगाव येथील आप्पा लहाने हे तिथे आले. मुरुम टाकत असलेली शेती आमची असून त्याचा कुठलाही मोबदला शासनाकडून मिळालेला नाही. काम बंद न केल्यास स्वत:ला जाळून घेवू, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांनी काम बंद पाडले. त्यामुळे अभियंता कोटेचा यांच्या फिर्यादीवरून शेतकऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.