गुन्हे शाखेला आयएसओ दर्जा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 11:31 PM2018-01-22T23:31:06+5:302018-01-22T23:32:52+5:30
जालना : येथील गुन्हे शाखेने कार्यालयीन कामकाजात आणलेली सुसूत्रता, तपास कामाचा उंचावलेला दर्जा यामुळे या कार्यालयास आएसओ दर्जा प्राप्त ...
जालना : येथील गुन्हे शाखेने कार्यालयीन कामकाजात आणलेली सुसूत्रता, तपास कामाचा उंचावलेला दर्जा यामुळे या कार्यालयास आएसओ दर्जा प्राप्त होणार आहे. या संदर्भातील अंतिम परीक्षण सोमवारी झाले. येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासही हा दर्जा प्राप्त होणार आहे.
कुठल्याही कार्यालयास आयएसओ दर्जा महत्त्वाचा मानला जातो. जिल्हा पोलीस दलाने आपल्या प्रशासकीय कामकाजांच्या अनेक बाबींमध्ये सुधारणा करत सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला आहे. आॅनलाइन कामास प्राधान्य दिले जात आहे. विशेष म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयाने अभिलेखांच्या नोंदी, प्रशासकीय कामकाज, गुन्ह्यांच्या तपासात झालेली वाढ यामुळे या शाखेची आयएसओ नामांकनासाठी नाशिक येथील एका संस्थेमार्फत परीक्षण सुरू आहे. सोमवारी संस्थेचे परीक्षक जयवंत पगारे, संदीप जाधव, समन्वयक राहुल वझे, परीक्षित शर्मा यांनी गुन्हे शाखा कार्यालयात दस्तावेज तपासणी केली. गुन्ह्यांच्या नोंदी, गुन्हे कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न, खातेनिहाय संचिका, कामाबाबत केलेली पूर्तता, संगणकीकृत कामकाज, धोरण, उद्दिष्टे, गुन्हे पडताळणी आदींची तपासणी करण्यात आली. येथील पोलीस कॉम्प्लेक्समधील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातही अशाच पद्धतीने तपासणी करण्यात आली. संस्थेच्या अधिका-यांनी आवश्यक नोंदी घेऊन लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. गुन्हे शाखा व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयास आयएसओ ९००१ व २०१५ हा दर्जा मिळणार असून, पालकमंत्र्यांच्या हस्ते २६ जानेवारीला याबाबतचे प्रमाणपत्र मिळणार असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी सांगितले.