गोदावरी पात्रात वाळू तस्करांवर जालना गुन्हे शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:41 AM2018-01-19T00:41:14+5:302018-01-19T00:41:19+5:30
रामसगाव येथे गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाºया तस्करांविरुद्ध जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : रामसगाव येथे गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाºया तस्करांविरुद्ध जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. गुरुवारी सायंकाळी केलेल्या या कारवाईत जेसीबी मशीन, हायवासह ४५ लाखांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तीर्थपुरी परिसरात गुरुवारी सायंकाळी आरोपीच्या शोधात फिरत असताना रामसगावला गोदावरी नदीपात्रातून जेसीबी मशीनने अवैध वाळूची तस्करी केली जात असल्याची माहिती पथकाला मिळाली.
माहितीनुसार जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली रंजित वैराळ, संजय मगरे, रामेश्वर बघाटे यांच्या पथकाने रामसगावला गोदावरी नदीच्या पात्रात जाऊन छापा मारला.
यावेळी विना नंबरचा जेसीबी मशीन हायवा क्र. एम.एच.२०.ई.जी.५९२२ मध्ये वाळू भरताना आढळून आला.
जेसीबी मशीन चालक अशोक रामभाऊ कातकडे रा. तीर्थपुरी, जेसीबी मालक नवनाथ खोजे रा. जोगलादेवी, हायवा चालक कपिल शिवदास राठोड, ह. मु. कुंडलीकनगर, औरंगाबाद, हायवा मालक मदन खोजे रा. जोगलादेवी ता. घनसावंगी यांना वाळू परवान्या बाबत माहिती विचारली असता, परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस नाईक रंजित वैराळ यांच्या फियार्दीवरून जेसीबी मशीनसह हायवावर कारवाई करण्यात आली असून, एकूण ४५ लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गोंदी पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे.