मारहाणीचा गुन्हा दाखल होताच कर्मचाऱ्याने घेतली विहिरीत उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 01:21 AM2020-01-16T01:21:13+5:302020-01-16T01:21:30+5:30
जनरल स्टोअर्सचा व्यवसाय करणा-या पती- पत्नीला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल होताच एका शासकीय कर्मचा-याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी तीर्थपुरी येथे घडली
लोकमत न्यूज नेटवर्क
तीर्थपुरी : जनरल स्टोअर्सचा व्यवसाय करणा-या पती- पत्नीला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल होताच एका शासकीय कर्मचा-याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी तीर्थपुरी येथे घडली. त्या कर्मचा-यास लोकांनी विहिरीतून बाहेर काढून अंबड येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले आहे. चत्रभुज श्रीरंग जारे असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-या कर्मचा-याचे नाव आहे.
तीर्थपुरी येथील दिनेश कुंभकर्ण व त्यांची पत्नी सुनीता कुंभकर्ण हे मंगळवारी लक्ष्मीनारायण रोडवरील जनरल स्टोअर्समध्ये बसले होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास तीर्थपुरी येथील रहिवासी गोंदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लिपिक चत्रभुज श्रीरंग जारे यांनी दोघांना मारहाण केली. यात दिनेश यांच्या डोक्याला मार लागला. याप्रकरणी दिनेश कुंभकर्ण यांच्या फिर्यादीवरून चत्रभुज जारे यांच्याविरुध्द तीर्थपुरी चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरून जारे यांनी बुधवारी खालापुरी रस्त्यावरील स्वत:च्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्यक्षदर्शींनी लगेचच जारे यांना बाहेर काढले. त्यांच्यावर अंबड येथे उपचार सुरू आहेत.
जारे यांनी केली पोलिसांत तक्रार
कृशीवर्ता श्रीरंग जारे यांनी दिनेश कुंभकर्ण व सुनीता कुंभकर्ण यांच्याविरुध्द तीर्थपुरी पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारी त्या म्हणाल्या की, दिनेश कुंभकर्ण हे लघुशंकेसाठी जारे यांच्या वाड्यात गेले होते. लघुशंका केल्यानंतर पाणी का टाकले नाही, असे विचारताच दिनेश कुंभकर्ण यांनी कुशीवर्ता जारे यांच्यासोबत भांडण करून उजव्या हाताला चावा घेतला. ही माहिती त्यांचा मुलगा चत्रभुज जारे यांना कळल्यामुळे तो दिनेश यांना विचारण्यासाठी गेला होता. त्याने मारहाण केली नसल्याचे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.