बेकायदेशिररित्या आंदोलन केल्याने ४९ एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 12:28 PM2021-10-30T12:28:05+5:302021-10-30T12:28:24+5:30
एसटी कर्मचाऱ्यांनी बेकायदेशिररित्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जाफराबाद बसस्थानकाचे गेट बंद करून अधिकाऱ्यांना कोडूंन ठेवले होते
जालना : जाफराबाद बसस्थानकाचे गेट बंद करून सर्व अधिकाऱ्यांना कोडूंन बेकायदेशिररित्या आंदोलन करणाऱ्या ४९ एसटी कर्मचाऱ्यांवर शुक्रवारी रात्री उशिरा जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांनी बेकायदेशिररित्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जाफराबाद बसस्थानकाचे गेट बंद करून अधिकाऱ्यांना कोडूंन ठेवले होते. शिवाय, काही कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळीही केली होती. याची माहिती जाफराबाद पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सौम्य लाठीचार्ज करून कर्मचाऱ्यांना बाजूला केले. या प्रकरणी आगारप्रमुख रंजी बलदेव राजपूत यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री उशिरा तब्बल ४९ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एसटी महामंडळातील आठ संघटनांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन केली होती. महामंडळातील कर्मचाऱ्यांना तीन टक्के याप्रमाणे वार्षिक वेतनवाढ द्यावी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता द्यावा, दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान द्यावे यासह इतर अनेक मागण्यांसाठी एसटीचे कामगार आणि कर्मचारी बेमुदत उपोषणाला बसले होते. त्यात सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी त्यावर तोडगा निघाल्याने संप मागे घेण्यात आला होता. परंतु, शुक्रवारी सकाळी काही कर्मचाऱ्यांना या मागण्या मान्य नसल्याने त्यांनी पुन्हा संप पुकारला होता.