वेशांतर करून फिरणाऱ्या गुंडाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 01:00 AM2019-04-16T01:00:33+5:302019-04-16T01:00:54+5:30
१४ एप्रिलच्या मिरवणुकीत वेशांतर करुन फिरणारा तडीपार आरोपी डिंग-या उर्फ विलास हौशीराम सोनकांबळे याला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने रविवारी रात्री सुभाष चौक ते महावीर चौक दरम्यान अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : १४ एप्रिलच्या मिरवणुकीत वेशांतर करुन फिरणारा तडीपार आरोपी डिंग-या उर्फ विलास हौशीराम सोनकांबळे याला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने रविवारी रात्री सुभाष चौक ते महावीर चौक दरम्यान अटक केली.एकाच महिन्यात तीनदा तडीपारीचे उल्लंघन केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडावर हद्दपारीची कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते यामुळे पोलिसांनी कारवाई करुन तिघांना जिल्ह्यातून हद्दपार केल्याची माहिती आहे. डिंगºया उर्फ विलास हौसीराम सोनकांबळे याच्याविरुध्द शहरासह जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद असल्याने एडीएसच्या पथकाने २४ मार्च रोजी डिंगºयाला नूतन वसाहत परिसरातून मोठ्या शिताफीने अटक केली होती. त्यानंतरही तो शहरात आढळून आल्याने ८ एप्रिलला गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. दोन वेळेस पकडूनही रविवारी साडेनऊ वाजेच्या सुमारास आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत वेशांतर करुन सुभाष चौक ते महावीर चौक परिसरात फिरताना उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या पथकाला आढळून आला. पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला झडप मारुन ताब्यात घेतले.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक सिंघल यांनी जिल्ह्यातील निवडणूक काळात गुन्हेगारांची धरपकड करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीसांना दिले होते. यामुळे जिल्हा पोलीस यंत्रणा सतर्क होऊन स्थानिक गुन्हे शाखा, एडीएससचे पथक आणि चारही उपविभागीय पोलीस अधिकाºयांनी कारवाईचा धडाकाच सुरु केला आहे. गुंड डिंगºया उर्फ विलास सोनकांबळेला जालना, औरंगाबाद , बीड या तीन जिल्ह्यांतून हद्दपार केले आहे. असे असताना तो शहरात आढळून येतोच कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस त्याला शहरापासून २५ किलोमीटरवर असलेल्या देऊळगावराजा परिसरात सोडून आपले हात वर करत आहेत. निव्वळ केसेस दाखल करण्याच्या नादात पोलीस यंत्रणा ठोस कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याने सर्वसामान्यांत संताप आहे. याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे.