खंडणीखोरांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, बलात्कार, विनयभंगाचा गुन्हा
By संजय तिपाले | Published: August 6, 2023 03:45 PM2023-08-06T15:45:07+5:302023-08-06T15:46:10+5:30
पत्रकारितेच्या आडून ब्लॅकमेलिंगचा गोरखधंदा: आरमोरी पोलिसांकडून कसून चौकशी
गडचिरोली : आरमोरी येथील डॉक्टर दाम्पत्याला धमकावत ब्लॅकमेल करणाऱ्या खंडणीखोरांची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे. यापूर्वी एकावर बलात्काराचा तर दुसऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद आहे. नागपूर येेथे पोर्टलच्या आडून त्यांनी ब्लॅकमेलिंगचा गोरखधंदा सुरु केला होता, त्यांनी अशा पध्दतीने आणखी कोणाकोणाकडून खंडणी उकळली, याची पोलिसांकडून झाडाझडती सुरु आहे.
अमित प्रभाकर वांद्रे (वय ३२), दिनेश सदाशिव कुंभारे (४२), विनय विजय देशभ्रतार (२७), रोशन भयालाल बरमासे (३६), सुनील मधुकर बोरकर (४६, सर्व, रा. नागपूर) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या पाच जणांपैकी दोघे नागपूर येथे पोर्टल चालवितात, तर तिघे त्यांचे सहकारी आहेत. आरमोरी येथील
सोनाली अमोल धात्रक (३८, रा. आरमोरी) या खासगी डॉक्टर आहेत तर त्यांचे पती डॉ.अमोल हे आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहेत.
३ ऑगस्टपासून हे सर्व जण डॉ.सोनाली व डॉ.अमोल यांना तुमची वैद्यकीय शिक्षणाची पदवी बनावट असल्याचा आरोप करुन पाच लाखांच्या खंडणीसाठी धमकावत होते, शिवाय घरी जाऊन डॉ. सोनाली यांच्या पर्समधून एक लाख रुपये हिसकावत चार लाख रुपयांसाठी व्हॉटस्अप कॉल तसेच प्रत्यक्ष भेटूनही ब्लॅकमेलिंगचा सिलसिला सुरु होता. अखेर ४ ऑगस्टला डॉ. सोनाली धात्रक यांनी धाडस दाखवत आरमोरी ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानंतर पाच जणांवर खंडणी, दरोडा, घरात विनापरवाना प्रवेश या कलमांन्वये गुन्हा नोंदविला. गुन्हे शाखेचे पथक व आरमोरी पोलिसांनी रात्रीतून अटकसत्र राबवून पाचही जणांच्या मुसक्या आवळल्या. सध्या ते पोलिस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. तपासात सर्व बाबी स्पष्ट होतील, आणखी कोणाकडून त्यांनी खंडणी वसूल केली आहे का, यादृष्टीने तपास सुरु असल्याचे उपअधीक्षक साहिल झरकर यांनी 'लोकमत'ला सांगितले.
नागपूरमध्ये कारनामे
दरम्यान, यातील दोन आरोपींनी यापूर्वी नागपूरमध्ये कारनामे केल्याची पोलिस दफ्तरी नोंद आढळली आहे. एकावर बलात्कार व दुसऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद आहे. नागपूरमध्ये त्यांनी काही व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल केल्याची प्राथमिकमाहिती आहे, पण अद्याप तक्रार देण्यासाठी कोणी पुढे आलेले नाही. योग्य तो तपास केला जाईल, असे आरमोरीचे पोलिस निरीक्षक व तपास अधिकारी संदीप मंडलिक यांनी सांगितले.