पोलिसांच्या रडारवर जिल्ह्यातील गुन्हेगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:46 AM2019-08-13T00:46:38+5:302019-08-13T00:46:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : आगामी गणेशोत्सव, निवडणुकांसह इतर सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विविध कारवाया केल्या जात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आगामी गणेशोत्सव, निवडणुकांसह इतर सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विविध कारवाया केल्या जात आहेत. गावगुंडांना लगाम लावण्यासाठी त्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस दलाकडून चालू वर्षात दाखल झालेल्या प्रस्तावानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी आजवर १३ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. तर ३७ प्रस्ताव प्रलंबित आहेत.
जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने विविध कारवाया सतत राबविल्या जातात. प्रतिबंधक कारवाई करण्यावर भर दिला जातो. मात्र, अशा कारवाईनंतरही गुंडगिरी करणाऱ्यांना पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी हद्दपार करण्याचा धडाका लावला आहे. मागील दोन वर्षात झालेल्या हद्दपारीच्या कारवाईच्या दुप्पट कारवाई चालू वर्षातील सात महिन्यात करण्यात आल्या आहेत.
कलम ५५ मपोका अंतर्गत टोळीतील तिघांचा तडीपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या तिघांनाही हद्दपार करण्यात आले आहे.
दोन वर्षात ५५ : तर सात महिन्यांत ५२ प्रस्ताव
पोलीस दलाकडून मागील तीन वर्षात एकूण १०७ हद्दपारीचे प्रस्ताव उपविभागीय अधिका-यांकडे पाठविण्यात आले होते. यात मागील दोन वर्षात २०१७ व २०१८ मध्ये तडीपारीचे ५५ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. तर चालू वर्षात २०१९ मध्ये सात महिन्यातच तब्बल ५२ प्रस्ताव उपविभागीय अधिका-यांकडे पाठविण्यात आले आहेत.
आगामी काळात गणेशोत्सव, विधानसभा निवडणुका, दिवाळीसह इतर सण-उत्सव साजरे केले जात आहेत. निवडणुकांसह सण-उत्सव शांततेत पार पडावेत, गुंडगिरीला आळा बसावा, यासाठी ठाणेस्तरावरून हद्दपारीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यामुळे गुंडगिरी करून समाजात दहशत पसरविणा-यांना चांगलाच चाप बसणार आहे.
..तर कारवाई
हद्दपारीच्या कालावधीत संबंधित व्यक्ती शहरासह जिल्ह्यात दिसला तर त्याला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली जाते. स्थानिक गुन्हे शाखा, एडीएससह ठाणेस्तरावरून या कारवाई केल्या जातात. तडीपार आरोपी दिसला तर पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.