कोरोनातील संकट, कानांना बुरशी, बॅक्टेरियाचाही धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:21 AM2021-06-25T04:21:49+5:302021-06-25T04:21:49+5:30
कोरोनामुळे सर्वसामान्याची झोप उडाली आहे. त्यात आता अनेकांच्या कानाला बुरशी, बॅक्टेरियाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अस्वच्छ ...
कोरोनामुळे सर्वसामान्याची झोप उडाली आहे. त्यात आता अनेकांच्या कानाला बुरशी, बॅक्टेरियाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अस्वच्छ पाण्यात पोहणे, कानात पाणी राहिल्याने ओल राहणे, सतत हेडफोनचा वापर केल्याने कानात ओलावा निर्माण होऊ नंतर कान दुखण्यासह इतर त्रास होऊ लागताे. त्यामुळे कानाला खाज येण्यासह कमी ऐकू येण्याचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे आता कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांनीही कानाला होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करणे अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कानाचा कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर पुढील शारीरिक त्रास टाळण्यासाठी वेळेवर तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
काय घ्याल काळजी?
कान नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवावेत. विशेषत: अंघोळीनंतर किंवा पावसात भिजल्यानंतर कान तातडीने कोरडे करावेत. हेडफोन वापरत असाल तर तो वारंवार निर्जंतुक करावा. कानातील मळ काढताना तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच प्रक्रिया करावी.
मधुमेहाचा त्रास असलेल्या आणि कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी कानात ओलावा राहू नये, याची अधिक काळजी घ्यावी. कोणताही त्रास असेल तर तज्ज्ञांमार्फत वेळेवर उपचार घ्यावेत.
पावसाळ्यात ओलाव्यामुळे धोका
कानामध्ये सतत ओल राहत असेल तर बुरशीजन्य आजार होऊ शकतो. कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना हा त्रास होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कानामध्ये ओलावा राहू नये, याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. कान ओले असतील तर ते वेळीच साफ करावेत.
मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तीलाही कानामागील बुरशी, बॅक्टेरियाचा त्रास होवू शकतो. मधुमेहाची बाधा असलेल्या नागरिकांनीही कानाला खाज येणे, जखम होणे, दात दुखणे आदी विविध प्रकारचे त्रास होत असतील तर वेळेतच तज्ज्ञ डॉक्टरांकडे जावून औषधोपचार घेणे गरजेचे आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यात कोरोनानंतर कोणाच्या कानाला कोणताही त्रास होत असेल तर नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. कान साफ करण्यापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. कानाला बुरशीजन्य आजार जडू नयेत, यासाठी आवश्यक ती खबरदारी आणि वेळेवर उपचार घेणे महत्त्वाचे आहे.
- डॉ. अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक
कान सतत ओला राहिला तर कानाला खाज येणे, सतत खाजविल्यामुळे जखम होण्यासह बुरशीजन्य आजार होण्याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी कानाला कोणताही त्रास होत असेल तर तज्ज्ञांमार्फत उपचार घेणे गरजेचे आहे. शिवाय कान साफ करत असाल तर त्यावेळीही तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच कान साफ करणे गरजेचे आहे.
- डॉ. बी. बी. चव्हाण, कान-नाक-घसा तज्ज्ञ