शेतकऱ्यांवरील संकट संपेना; सोयाबीन पीक पडू लागले पिवळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 08:03 PM2020-07-13T20:03:20+5:302020-07-13T20:05:19+5:30
अनेकांनी दुबार पेरणी केली असून, आता दुसरेच संकट आले आहे.
धावडा (जि. जालना) : वातावरणातील बदलामुळे भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरात अनेक ठिकाणी सोयाबिनचे पीक पिवळे पडल्यामुळे शेतकऱ्यांत चिंता वाढली आहे.
यंदा प्रथमच धावडा परिसरातील वाढोणा, जाळीचादेव, भोरखेडा, प्रतापनगर, पोखरी, दहिगाव, मेहगाव, विझोरा, आडगाव, शेलुद, लेहा, वडोद तांगडा या गावांत मोठ्या प्रमाणावर सोयाबिनचा पेरा झाला आहे. मात्र, सोयाबिनचे बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाल्याने अनेक ठिकाणी त्याची उगवण क्षमता झाली नाही. यात अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. त्यातच आता अनेक ठिकाणी सोयाबिनचे पीक पिवळसर पडल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
शेतकरी सय्यद गयासोद्दीन म्हणाले, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी केलेले सोयाबिनचे बियाणेही यंदा निकृष्ट दर्जाचे निघालेले आहे. त्यामुळे बियाणांची उगवण क्षमता चांगली झाली नाही. यात अनेकांनी दुबार पेरणी केली असून, आता दुसरेच संकट आले आहे.