पाणीप्रश्नावरून नगर पालिकेत रणकंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:56 AM2019-03-06T00:56:30+5:302019-03-06T00:56:44+5:30
लहानमोठ्या मुद्यावरून संतप्त नगरसेवकांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणी, घनकचरा तसेच शहरातील पथदिवे, पालिकेच्या मालमत्ता, सिडकोला पाणी देण्याचा मुद्दा यासह अन्य लहानमोठ्या मुद्यावरून संतप्त नगरसेवकांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी अधिकारी सदस्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देत नसल्याचे निदर्शनास आल्यावर नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आणि उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी मध्यस्थी करून अधिकाऱ्यांनी जबाबदारीचे भान ठेवावे, असे निर्देश दिले.
टाऊन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ही सभा नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, अतिरिक्त मुख्याधिकारी केशव कानपुडे यांच्यासह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. प्रारंभी आज सर्व साधारणसभा असताना मुख्याधिकारी नसल्याच्या मुद्यावरून नगरसेवकांनी जाब विचारला. ते मुंबईत अंदाज समितीच्या सुनावणीसाठी गेले असल्याचे सांगण्यात आले. यावेळी प्रभाग क्रमांक एकच्या नगरसेविका धुगे यांनी माझ्या प्रभागात एक महिन्यानंतर पाणीपुरवठा होतो,तो किमान आठ दिवसांतून एकदा करावा अशी मागणी केली. तर प्रभाग क्रमांक १२ च्या नगरसेविकेने त्यांच्या प्रभागातील पाणी समस्येवर सभागृहाचे लक्ष वेधले. अंतर्गत जलवाहिनीचे काम करताना संबंधित एजन्सी निकष डावलून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. याकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी केली. याचवेळी अन्य एका नगरसेविकेनेही त्यांच्या प्रभागातील पाणी, स्वच्छतेचा मुद्दा मांडला.
यावेळी संध्या देठे यांनी देखील त्यांच्या प्रभागात पथदिवे बसविण्या बाबत पालिका प्रशासन चालढकल करत असल्याचा आरोप करून, अभियंत्यांनी कुठली तरी एक तारीख द्यावी अशी मागणी त्यांनी केली. नगरसेवक शाह आलमखान, महावीर ढक्का, श्रावण भुरेवाल, पिंटू रत्नपारखे, अरूण मगरे यांनी त्यांच्या प्रभागातील मुद्यांसह पालिकेच्या मालमत्तांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले. टाऊन येथे ५१ दुकाने बांधली आहेत, परंतु यातून पालिकेला काहीच उत्पन्न मिळत नसल्याचे सांगितले. जालना शहरात एकूण २९८ पालिकेच्या दुकाना भाडेतत्वावर १९८५ साली दिल्या असून, त्यांचा करार आता संपत आल्याने त्याचे नूतनीकरण करण्यासह भाडे वाढवून देणार असल्याचे यावेळी मालमत्ता विभागाकडून सांगण्यात आले.
जिंदल मार्केटचा विषय याही वेळी चर्चेत आला होता. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केल्याचा आरोप ढक्का यांनी केला. दरम्यान शहरात अंतर्गत पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीचे काम करणा-या सल्लागार समितीवरही सभागृहात ताशेरे ओढले गेले. शहरातील विविध ठिकाणी जलवाहिनीला गळती लागल्याचेही अनेकांनी सांगितले. याकडे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता हे प्रत्यक्ष कामावर जाऊन पाहणी करण्या ऐवजी मोबाईलवरूनच याचा आढावा घेत असल्याचा आरोप केला. यावेळी विष्णू पाचफुले यांनी चामडा बाजार शहराबाहेर हलविण्याची मागणी केली. तसेच पाणी, पथदिवे आणि घनकचरा प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला. डिसेंबर अखेर सामनगाव येथील नवीन प्रकल्प कार्यान्वित होईल, असे अश्वासन देण्यात आले.
उपनगराध्यक्ष राऊत यांनी कोंडवाड्यासह अन्य मुद्यांवरून अधिका-यांची कानउघाडणी केली.
अधिका-यांनी दक्ष राहावे
पालिकेच्या सर्वसाधारण सभेतून जालना शहरात पालिकेचे अधिकारी, कर्मचारी कशी चालढकल करून वेळ मारून नेतात हे विदारक चित्र दिसते. ही बाब जालना शहराच्या एकूणच विकासासाठी हानिकारक आहे. त्यामुळे अधिका-यांनी कार्यालयीन वेळेत कार्यालयात राहून आपल्या विभागाचे काम चांगले कसे होईल याकडे लक्ष द्यावे; नसता आता अशा अधिकाºयांची माहिती काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई प्रस्तावित करू, एकच काम प्रभागात दोन ठिकाणी होत असतील तर त्यातील एक काम रद्द झाले पाहिजे.
- संगीता गोरंट्याल, नगराध्यक्षा