पावसाने डोळे वटारल्याने पिके संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:19 AM2021-07-03T04:19:49+5:302021-07-03T04:19:49+5:30
जूनच्या सुरुवातीलाच वालसावंगी परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. या पावसावरच शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन, कपाशी आदी पिकांची ...
जूनच्या सुरुवातीलाच वालसावंगी परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. या पावसावरच शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन, कपाशी आदी पिकांची लागवड केली. पाऊस पडेल अशी अशा शेतकऱ्यांना होती. पिकेही चांगली बहरली. परंतु, त्यानंतर परिसरात एकही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे अंकुरलेले कोंब जळत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध ते ठिबक सिंचनाद्वारे पाणी देत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध नाही त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे.
वालसावंगी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पारध व धावडा परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. परंतु, वालसावंगीत पावसाचा एकही थेंब पडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांनी बियाणे कुठून आणावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
हवामान खात्यावर शेतकऱ्यांचा रोष
यंदा राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. परंतु, परिसरात अद्यापही जोरदार पाऊस झाला नाही. हवामान खात्याचा अंदाज पुन्हा फोल ठरल्याने शेतकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.