जालना जिल्ह्यात थंडीच्या लाटेत कोमेजली पिके...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 12:28 AM2019-01-01T00:28:31+5:302019-01-01T00:28:54+5:30
पाच दिवसांपासून पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पेरू, डाळिंबाच्या बागा अक्षरश: वाळल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पेरू, डाळिंबाच्या बागा अक्षरश: वाळल्या आहेत. तसेच ज्वारी, भोपळ््याच्या पिकासह भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतक-यांना पुन्हा दुष्काळात तेरावा महिना आला आहे़
तालुक्यातील सावंगी अवघडराव येथील गजानन हरिभाऊ भुते, कृष्णा भुते, पांडुरंग काटोले, रवींद्र शिंंदे यांनी गेल्या पाच- सहा वर्षांमध्ये पेरूची फळबाग चांगली फुलविली होती. या फळबागेपासून त्यांची आर्थिक उन्नती सुद्धा झाली. यावर्षी त्यांनी शेततळ््यातील पाण्यावर फळबाग जोपासली. यामुळे पेरूचे उत्पादन चांगले भरभरून आले होते. परंतु, पेरूचा अर्धा हंगाम संपत आला असतानाच गेल्या चार- पाच दिवसांपासून तालुक्यात थंडीची लाट आली आहे. यामुळे नागरीक सकाळी लवकर घराबाहेर पडत नाहीत. मात्र, या थंडीमुळे फळबागा वाळतील असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र, एकट्या अवघडराव सावंगी या गावातील गजानन भुते यांच्या दहा एकर पेरूच्या बागेतील ३ एकर मधील पेरूची झाडे वाळली आहेत. या झाडांना पेरू सुद्धा लगडलेले आहेत. शिवाय पांडुरंग काटोले व रवींद्र शिंदे यांचे दोन एकर मधील पेरूची बाग वाळली आहे.
या शेतकºयांनी मोठ्या परिश्रमाने पेरू व सीताफळाची बाग पिकवून या भागातील शेतकरी आधुनिक शेतीकडे वळले होते. त्यामुळे या गावातील शेतकºयांनी सीताफळ व पेरूची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती.
उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यावर शेतक-यांनी ठिबक सिंचनावर भोपळ्याचे सीड्स प्लॉट लावले होते. त्यावर मोठ्या प्रमाणात खर्चही केला होता. भोपळ््याला काही ठिकाणी फुले व भोपळे लागले. पण, थंडीमुळे भोपळ््याचे पीक पूर्णपणे वाळले आहे. यात बोरगाव खडक येथील फकिरबा पार्वे, राजेंद्र पार्वे, गंगाधर व्यवहारे, रमेश पार्वे यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकट्या बोरगाव खडकमध्ये एका कंपनीच्या भोपळ््याच्या सीड्सचे २५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे शेतकºयांनी सांगितले आहे़
पिंपळगाव सुतार, चांधई एक्को, राजूर, बाणेगाव, हसनाबाद या भागातील काही शेतक-यांनी शाळू ज्वारीची पेरणी केली होती. या ज्वारीला काही ठिकाणी कणसे लागली आहेत. मात्र, या थंडीमुळे ज्वारीचे पीक वाळले आहे.
पिंपळगाव सुतार येथील शेतकरी राजू दानवे यांनी सांगितले की, दोन एकर क्षेत्रामध्ये ज्वारीची पेरणी केली होती. मात्र, या थंडीमुळे पीक पूर्णपणे वाळले आहे. यामुळे आता केवळ ज्वारी पिकाचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग होईल.
भोपळ्याचे पीक झाले उद्ध्वस्त
तालुक्यातील हसणाबाद परिसरातील बोरगाव खडक, खडकी, बोरगाव, सिंरजगाव वाघ्रूळ, निमगाव, नळणी, जवखेडा, रजाळा, टाकळी, विटा या पूर्णा व गिरजा या नदी काठावर पाणी उपलब्ध असलेल्या शेतकºयांनी एका कंपनीकडून भोपळा पीकाचे सिड्सचे प्लॉट घेतले आहेत. थंडीमुळे या पिकाची अशी अवस्था झाली.
भाजीपाला गारठला
तालुक्यात काही ठिकाणी ठिंबक सिंंचनावर पाच दहा गुंठ्यांमध्ये वांगी, टॉमेटो, गवार, मेथीची भाजी, कारले, दोडके, मिरची इ. भाजीपाला शेतकºयांनी लावला होता. मात्र, थंडीमुळे हा भाजीपालाही गारठला आहे. यामुळे येणा-या काळात भाजीपाल्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे़
हरभ-याचे पीक बहरले
या थंडीमुळे बहुतांश पिकांचे नुकसान झाले असले तरी ज्या शेतकºयांनी हरभरा गहू पिकाची लागवड केली आहे, अशा पिकांना या थंडीचा लाभ झाला आहे.