बाळूमामाच्या मेंढ्या दर्शनासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:53 AM2019-05-23T00:53:23+5:302019-05-23T00:53:44+5:30
संपत्ती म्हटली की तिला मालक आलाच, ती मालका शिवाय असूच शकत नाही, मग ती सजीव असो की निर्जिव ! मात्र हा नियम बाळू मामाच्या मेंढ्यांच्या बाबतीत खोटा ठरत आहे. या हजारो मेंढ्यांना चालक आढळतो, परंतु, मालक नाही हे विशेष होय.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : संपत्ती म्हटली की तिला मालक आलाच, ती मालका शिवाय असूच शकत नाही, मग ती सजीव असो की निर्जिव ! मात्र हा नियम बाळू मामाच्या मेंढ्यांच्या बाबतीत खोटा ठरत आहे. या हजारो मेंढ्यांना चालक आढळतो, परंतु, मालक नाही हे विशेष होय.
परतूर तालुक्यात बाळूमामाच्या मेंढ्या सध्या मुक्कामी आहेत. या मेंढ्यांना चालक आहेत, म्हणजे सांभाळणारे आहेत, परंतु मालक कोणीच नाही. कारण प्रज्ञावंत संत बाळू मामा वयाच्या ७४ व्या वर्षी सगुणरूप अदृश्य झाल्याचे भक्त सांगतात. मात्र, तत्पूर्वी बाळूमामांनी आपल्या सर्व शेळ््या, मेंढ्या, घोडे, इतर प्राणी व संपत्ती कोणाही नातेवाईकास, मित्राला, भक्तास वारस म्हणून दिली नाही, जमल्यास सांभाळ करा. समाजाला अन्न, पाणी व भक्तीचा लाभ करून द्या न जमल्यास सर्व डोंगरात सोडून आपला संसार सुखात करा अशी आज्ञा मामांनी भक्तांना दिल्याने आज या वाढत असलेल्या मेंढ्यांना चालक जरी दिसत असले तरी कोणीच मालक नाही, हे विशेष होय. यांच मूळ गाव कोल्हापूर जिल्यातील आदमापूर येथे आहे.
या मेंढ्यांचे कळप (पालखी) पूर्ण राज्यभरच नव्हे तर भारतभर फिरत आहेत. या पालख्यांची संख्या १७ आहे. एका पालखी सोबत दोन ते अडीच हजार मेंढ्यांची संख्या आहे. यातील एक पालखी वरफळ शिवारात मुक्कामी आहे. या मेंढ्या सोबत आठ ते दहा लोक अनुभवी आहेत. यामध्ये प्रमुख कारभारी गायके मामा हे आहेत. तर त्यांना दगा अण्णा, बाळू सोनवणे हे सहाय्य करतात. या मेंढ्या गावकरीच सांभाळतात.
जोपर्यंत या मेंढ्या मुक्कामी आहेत, तोपर्यंत सर्व अन्नपाणी गावकरीच पुरवतात. सात- आठ दिवसानंतर या मेंढ्या आपला मुक्काम हलवतात.
या मेंढ्या पाहण्यासाठी व दर्शनासाठी रात्री मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावत आहेत. या ठिकाणी दररोज सकाळ, संध्याकाळ बाळूमामांच्या मूर्तीची आरती करण्यात येते. या आरतीला परिसरातील दोन ते अडीच हजार भाविक हजेरी लावत आहेत.