पोळ्यासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:17 AM2019-08-26T00:17:15+5:302019-08-26T00:17:51+5:30
सर्जा- राजाचा साज- श्रृंगार खरेदीसाठी रविवारी येथील बाजारात शेतक-यांनी गर्दी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : राजूरसह परिसरात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी वर्षभर शेतीत राबणा-या सर्जा- राजाचा पोळा सण चार दिवसावर आला आहे. त्यामुळे सर्जा- राजाचा साज- श्रृंगार खरेदीसाठी रविवारी येथील बाजारात शेतक-यांनी गर्दी केली होती.
पंचक्रोशीतील ३० ते ४० खेड्यातील नागरिक या आठवडी बाजारात खरेदीसाठी येतात. पोळा सण असल्यामुळे येथे बैलांच्या सजावट साहित्याच्या अनेक दुकान आल्या होत्या. दुष्काळी परिस्थिती असली तरी वर्षभर शेतक-यांच्या साथीला राबणा-या सर्जा- राजाचा साज खरेदीसाठी शेतक-यांनी बाजारात गर्दी केली होती. बाजारात घुंगर माळा, वेसन, दोरी, गोंडे, झुला, हिंगूळ, कवडीमाळ, घाटे इ. साहित्याची दुकाने थाटली होती.
दुष्काळी स्थितीमुळे शेतक-यांनी खरेदीसाठी हात आखडता घेतल्याचे चित्र दिसून आले. पोळा सणाला स्थानिक सर्व ग्रामदेवतांना नारळ फोडण्याची प्रथा आहे.
त्यामुळे बाजारात नारळ विक्रीच्या दुकानेही मोठ्या प्रमाणात लागली होती. पंधरा ते वीस रूपये दराने प्रति नारळाची विक्री सुरू होती. एक शेतकरी किमान दहा ते बारा नारळ खरेदी करताना दिसत होते.