राजुरेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:29 AM2019-09-18T00:29:29+5:302019-09-18T00:30:08+5:30
अंगारिका चतुर्थीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या राजुरेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : अंगारिका चतुर्थीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या राजुरेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. राजुरात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत भाविकांची रेलचेल सुरू होती.
मंगळवारी येणाऱ्या अंगारिका चतुर्थीचे गणेश भक्तांमध्ये विशेष महत्व असते. नवसाला पावणारा गणराया म्हणून राजुरेश्वराची ख्याती असल्याने मराठवाडा, विदर्भासह कानाकोपºयातून भाविक दर्शनासाठी येथे येतात.
सोमवारी रात्रीपासूनच भाविकांनी राजूरमध्ये गर्दी केली होती. सोमवारी रात्री १२ वाजता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, निर्मला दानवे, आ. नारायण कुचे यांच्या हस्ते राजुरेश्वराची महाआरती करून दर्शनासाठी मंदिराचे प्रवेशद्वार खुले करण्यात आले.
मंगळवारी सकाळी भाविकांची गर्दी कमी झाली. मात्र, दुपारनंतर पुन्हा गर्दीचा ओघ सुरू झाला. दरम्यान, अनेक अन्नदात्यांकडून भाविकांसाठी ठिकठिकाणी मोफत चहा, फराळाची सोय करण्यात आली होती.
दिवसभर पंचक्रोशीतून टाळ- मृदुंगाच्या गजरात गणरायाचा जयघोष करीत पायी दिंड्या राजुरात दाखल झाल्या. नुकताच झालेला गणेशोत्सव आणि पितृपक्ष पंधरवड्यामुळे गर्दीवर परिणाम झालेला दिसून आला.
भाविकांनी जोरदार पावसासाठी राजुरेश्वराला साकडे घातले. भाविकांची गर्दी पाहता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. परिस्थितीवर तहसीलदार संतोष गोरड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये नियंत्रण ठेवून होते.
सायंकाळपर्यंत किरकोळ प्रकार वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सपोनि. एम.एन. शेळके यांनी सांगितले.
प्रशासनाच्या नियोजनाअभावी भाविकांची गैरसोय
राजूर : अंगारकी चतुर्थी राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांचे योग्य नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले नसल्याने मंगळवारी भाविकांची गैरसोय झाली. अंगारकी चतुर्थीला मराठवाड्यातून लाखो भाविकांचा जनसागर उसळतो. त्या दृष्टीने प्रत्येक अंगारकी चतुर्थीला गणपती संस्थान आणि पोलीस प्रशासनाकडून सोमवार पासूनच नियोजन केले जाते. परंतु, मंगळवारी नियोजन करताना भाविक व स्थानिक नागरिकांचा प्रशासनाकडून कोणताही विचार करण्यात आला नसल्याने त्यांची गौरसोय झाली.
राजुरात दैनंदिन ३० ते ३५ खेड्यातील नागरिकांचा कायम वावर राहतो. यामुळे येथे नेहमी नागरिकांची गर्दी राहते. मंगळवारी प्रशासनाने राजूर पासून दोन किलोमीटर अंतरावर वाहनतळाची सोय केल्याने चिमुकल्यांसह आबाल- वृद्धांना पायी मंदिर गाठावे लागले. तसेच गावातील गल्लीबोळातील रस्ते खोदून चर पाडण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना घरी जाण्या येण्यासाठी कसरत करावी लागली. तसेच जागोजागी नाकाबंदी करून दुचाकी, कार चालकांना अडवण्यात आले.
जालना- भोकरदन मार्गावर जड वाहतूक बंद करण्यात आली होती. पोलीस प्रशासनाने अनेक ठिकाणी रस्ते बंद केल्याने अनेक ठिकाणी पोलीस व नागरिकांमध्ये वाद- विवाद आढळून आले. विद्यार्थ्यांसह पालकांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणापासून वंचित राहावे लागले. गणपती संस्थान व पोलीस प्रशासनाने नियोजन करताना स्थानिक ग्रामस्थ, राजूरला नियमित येणारे नागरिक व जालना- भोकरदनला जाणा-या वाहनचालकांना पर्यायी सोय उपलब्ध करून न दिल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागला.
हजारे यांना पहिल्या दर्शनाचा मान
राजुरेश्वराच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिलेल्या फुलचंद भागवत हजारे व त्यांच्या पत्नी शारदा हजारे यांना पहिल्या दर्शनाचा मान मिळाला. त्यांचा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी निर्मला दानवे, आ. नारायण कुचे, उपविभागीय महसूल अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार संतोष गोरड, सरपंच भाऊसाहेब भुजंग, सुधाकर दानवे, शिवाजी पुंगळे, गणेश साबळे, प्रशांत दानवे, सपोनि. एम. एन. शेळके, सचिन वाघमारे, विनोद डवले, रामेश्वर सोनवणे, राहुल दरक, व्ही. आर. धर्माधिकारी, कृष्णा जाधव, आप्पासाहेब पुंगळे आदींची उपस्थिती होती.