राहिलेल्या हुंड्यावरून सासरच्यांची क्रूरता; गर्भवती विवाहितेचा ओढणीने गळा आवळून खून
By दिपक ढोले | Published: April 28, 2023 04:47 PM2023-04-28T16:47:52+5:302023-04-28T16:48:20+5:30
खून करून रचला आत्महत्येचा बनाव; सासरच्या तिघांवर गुन्हा दाखल
जालना : हुंड्याचे राहिलेले ५० हजार रुपये न दिल्याने सासरच्यांनी गरोदर असलेल्या महिलेचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर मयत महिलेने गळफास घेतल्याचा बनाव केल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील सिध्दी येथे २६ एप्रिल रोजी घडली. निकिता सुखराम लोखंडे असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा नवऱ्यासह तीन जणांवर जाफराबाद पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती तपास अधिकारी सपोनि. बारवाल यांनी दिली.
देऊळगाव मही येथील रविशंकर शांताराम डिघे हे काही वर्षांपासून अहमदाबाद येथे कुटुंबासह कामासाठी गेले आहेत. मागच्या वर्षी त्यांची मुलगी निकिता यांचा विवाह जाफराबाद तालुक्यातील सिध्दी येथील सखाराम लोखंडे याच्यासोबत झाला होता. लग्नावेळी रविशंकर डिघे यांनी सुखराम याला हुंडा दिला होता. त्यातील ५० हजार रुपये राहिले होते. सुरुवातीला त्यांचा संसार चांगला सुरू होता. परंतु, काही दिवसांनी संशयित आरोपी पती सुखराम महादू लोखंडे, लक्ष्मण महादू लोखंडे, मंगलाबाई महादू लोखंडे (रा. सिध्दी) यांनी निकिता यांना हुंड्याचे राहिलेले पैसे घेऊन ये असे म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. त्यातच निकिता ही गरोदर राहिली.
परंतु, तरीही संशयितांनी तिचा छळ सुरूच ठेवला. २६ एप्रिल रोजीही हुंड्यावरून त्यांच्यात वाद झाला. तिन्ही संशयितांनी निकिता हिचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर गळफास घेतल्याचा बनाव केला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, मृतदेह विच्छेदनासाठी पाठविला. याप्रकरणी रविशंकर डिघे यांच्या फिर्यादीवरून संशयित सुखराम महादू लोखंडे, लक्ष्मण महादू लोखंडे, मंगलाबाई महादू लोखंडे (रा. सिध्दी) यांच्याविरूध्द जाफराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सपोनि. बारवाल यांनी दिली.