एक हेक्टर केळीची बाग जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:29 AM2019-03-09T00:29:38+5:302019-03-09T00:30:06+5:30
परतूर तालुक्यातील कोकाटे हातगाव शिवारात रानडुकरांनी हैदोस घातला आहे. गुरूवारी रात्री नारायण गुलाब ढवळे यांच्या शेतातील एक हेक्टरवरील केळी रान डुकरांनी जमीनदोस्त केली.
आष्टी : परतूर तालुक्यातील कोकाटे हातगाव शिवारात रानडुकरांनी हैदोस घातला आहे. गुरूवारी रात्री नारायण गुलाब ढवळे यांच्या शेतातील एक हेक्टरवरील केळी रान डुकरांनी जमीनदोस्त केली.
कोकाटे हादगाव या गावातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून केळीच्या बागांची लागवड करित असल्याने हे गाव केळीच्या बागांसाठी प्रसिद्ध होते. परंतु, सतत पडणारा दुष्काळ आणि वारे-वादळामुळे दरवर्षी केळीचे मोठ्या प्रमणात नुकसान होत आहे. यामुळे सद्यस्थितीत केळीच्या लागवडीत गावामध्ये मोठ्या प्रमणात घट झाली आहे.
मागील वर्षापासून येथे हरीण आणि रान डुुकरांच्या संख्येत वाढ होऊन ते ऊस आणि केळीचे मोठ्या प्रमणावर नुकसान करत आहेत. यामुळे या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
ढवळे यांनी केळीच्या बागेची लागवड करून त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. परंतु, रानडुकरांनी केळीची बाग नष्ट केल्यामुळे शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ढवळे यांनी केली आहे. दरम्यान वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावी अशी मागणी होत आहे.
दुष्काळ : खरीप, रबीची पीके गेली वाया
परतूर तालुक्यात यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने खरीप, रबीचे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यात परिसरातील शेतकºयांनी मोठ्या कष्टाने केळीच्या बागा जोपासल्या आहेत. परंतु, रानडुकरांनी एकाच रात्रीत ढवळे यांच्या एक हेक्टर मधिल केळीची बाग उद्धवस्त केली. यामुळे परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. याबाबत शेतकºयांनी वनविभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.