कपाशीच्या शेतात गांजाची लागवड; २३ झाडे जप्त, शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
By दिपक ढोले | Published: November 17, 2022 04:50 PM2022-11-17T16:50:32+5:302022-11-17T16:51:06+5:30
साडेचार लाखांचा ३१ किलो गांजा जप्त, मंठा पोलिसांची कारवाई
तळणी (जालना) : मंठा तालुक्यातील दहीफळ खंदारे येथील एका कपाशीच्या शेतात लावलेला गांजा मंठा पोलिसांनी गुरूवारी जप्त केला आहे. पोलिसांनी जवळपास ४ लाख ६५ हजार रूपयांचा १६ किलो गांजा जप्त केला आहे. काही दिवसांपूर्वीच गोंदी पोलिसांनीही मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला होता.
दहीफळ खंदारे येथील प्रदीप थावरा राठोड यांच्या शेतातील कपाशीच्या पिकामध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना मिळाली. या माहितीवरून उपविभागीय अधिकारी राजू मोरे व पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी पथकासह सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी कपाशीच्या शेताची पाहणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे दिसून आली.
पोलिसांनी जवळपास २३ गांजाची झाडे जप्त केली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. पोलिसांनी चार लाख ६५ हजार रूपये किंमतीचा १६ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात प्रदीप राठोड यांच्याविरुध्द मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोउपनि. बलभिम राऊत, पोउपनि. दिपाली शिंदे, पोहेकॉ. ढवळे, सुभाष राठोड, सुनिल इलग, विशाल खेडकर, आनंद ढवळे, विलास कातकडे यांनी केली आहे.