सध्या सरकारसोबत नेटवर्क जाम, एकमेकांना फोनच लागत नाही: मनोज जरांगे
By विजय मुंडे | Published: February 6, 2024 07:16 PM2024-02-06T19:16:35+5:302024-02-06T19:17:35+5:30
सरकारने उपोषणाची वेळ आणू नये, मनोज जरांगे यांचे आवाहन
जालना : सध्या सरकार सोबत नेटवर्क जाम आहे. एकमेकांना फोनच होत नाहीत. आम्हाला आता फक्त अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर आणि त्याची अंमलबजावणी हवी आहे. या मागणीवर ठाम असून सरकारने उपोषणाची वेळ आणू नये, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना केले.
जरांगे पाटील हे मंगळवारी चार दिवसांच्या दौऱ्यावर गेले. यानिमित्त मंगळवारी सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कामोठा, नवी मुंबई चेंबूर येथे कार्यक्रम आहे. आळंदीला मोठा कार्यक्रम आहे. तिथेच मुक्काम होणार आहे. उद्या मुंबईत वकीलांसोबत बैठक असून, मुंबईतील मराठा आंदोलकांसोबत बैठक आहे. १० तारखेला गोदा पट्ट्यातील मराठा समाजाची बैठक होणार असून, त्यानंतर उपोषण सुरू करणार आहे. बऱ्याचश्या प्रक्रिया सरकारकडून बाकी आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी हे आमरण उपोषण असल्याचेही ते म्हणाले.
शंभूराजे देसाईंच्या प्रश्नांवर उत्तर देताना जरांगे म्हणाले की, १५ तारखेला अधिवेशनात कायदा करा. २४ डिसेंबरपर्यंत किती नोंदी आढळल्या. नोंदीच्या नावाच्या याद्या अद्याप लागलेल्या नाहीत. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारला का? कोर्टात मांडला का? सग्यासोयऱ्यांबाबत त्यांचा नेमका काय खुलासा करत आहेत हे कळले पाहिजे, असेही ते म्हणाले.
जिथे भुजबळ तिथे धोका
प्रकाश शेंडगे यांनी नवीन पक्ष काढला यावर बोलतांना जरांगे म्हणाले, चांगली गोष्ट आहे. लोकशाहीमध्ये ज्याला त्याला अधिकार आहे. आपल्याला राजकारणातलं काही कळत नाही. भुजबळांचं ऐकून शेंडगे यांनी करू नये. ते अर्ध्यात शेंडगे यांना सोडून देतील. जिथे भुजबळ तिथे धोका होईल, असेही जरांगे पाटील म्हणाले.