मुख्याधिकाऱ्यांची ऑनलाईन फसवणूक, सायबर पोलिसांमुळे २४ तासांत मिळाली रक्कम परत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 02:39 PM2023-02-01T14:39:56+5:302023-02-01T14:43:37+5:30
खात्यातील ८० हजार रूपये ठगांनी लांबिवले, तत्काळ तक्रार केल्याने मिळाले पैसे परत
जालना : अंबड नगर पालिकेचे मुख्याधिकारी तथा नगर विकास यंत्रणेतील प्रभारी प्रकल्प संचालक विक्रम मांडुरके यांच्याच बँक खात्यातील ८० हजार रूपये महाठगांनी रविवारी लांबविले होते. मांडुरके यांनी फसवणुकीची तक्रार देताच सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करीत २४ तासात ती रक्कम मांडुरके यांच्या खात्यात परत वळविण्यात यश मिळविले.
अंबड नगर पालिकेचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके (रा. जालना) यांच्या एचडीएफसी बँक खात्यातील ८० हजार ५६ रुपये रविवारी २९ जानेवारी रोजी महाठगांनी ऑनलाइन ट्रान्सफर केले होते. खात्यावरील पैसे ट्रान्स्फर झाल्याचे समजताच विक्रम मांडुरके यांनी तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधून फसवणुकीची तक्रार दिली. मांडुरके यांची तक्रार प्राप्त होताच सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून विविध पोर्टलद्वारे माहिती संकलित केली.
संकलित केलेल्या माहितीनुसार पैसे वळविण्यात आलेल्या वॉलेट व बँकेला संबंधित रक्कम फ्रीज करण्याचे सूचित केले. सातत्याने या प्रक्रियेचा पाठपुरावा केल्याने मांडुरके यांच्या खात्यात ८० हजार ५६ रुपये २४ तासाच्या आत परत जमा झाले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपाधीक्षक इंदल बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे पोनि. मारुती खेडकर, अंमलदार लक्ष्मीकांत आडेप, किरण मोरे यांच्या पथकाने केली.