दाभोलकर हत्याप्रकरण: जालन्यातून शिवसेनेचा माजी नगरसेवक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 02:41 AM2018-08-19T02:41:45+5:302018-08-19T02:42:15+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात संशयित म्हणून शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर (४१) याला शनिवारी एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले
जालना : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात संशयित म्हणून शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर (४१) याला शनिवारी एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.
पुणे आणि मुंंबई येथील एटीएस पथकातील पोलीस सकाळपासून श्रीकांतच्या घरावर लक्ष ठेवून होते. पूर्ण खात्री पटल्यावर त्याला त्याच्या महसूल कॉलनीतील ‘राधेय’ या घरातून ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. तो सेनेकडून दोनदा नगरसेवक होता. कट्टर हिंदुत्ववादी म्हणून त्याची जालन्यात ओळख आहे. मध्यंतरी तो जालन्याऐवजी गोवा तसेच कोल्हापूर परिसरात वास्तव्यास होता. एटीएसचे पोलीस घरी आले तेव्हा कुटुंबीयांनी आमचा मुलगा असा गुन्हा करू शकत नाही, तुम्ही त्याला बळजबरीने अटक करत आहात, असा आरोप केला. काही महिन्यांपासून श्रीकांतवर पोलिसांची बारीक नजर होती. शनिवारी रात्री एटीएसचे पथक त्याला घेऊन पुण्याकडे रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.