खंजीर, चाकू, एअर गण बाळगणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या
By दिपक ढोले | Published: March 11, 2023 04:30 PM2023-03-11T16:30:08+5:302023-03-11T16:30:21+5:30
एकास हनुमान घाट येथून पोलिसांनी घेतले ताब्यात
जालना : चाकू, खंजीरसह दोन एअर गन बाळगणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी ताब्यात घेतले. शेख सोहेल शेख सलीम (२८, रा. हनुमान घाट, जालना) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून एक चाकू, एक खंजीर आणि दोन एअर गन जप्त करण्यात आल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी कर्मचाऱ्यांना शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेण्याची सूचना दिली होती. यावरून एलसीबीचे पथक अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढत होते. ही माहिती काढत असतानाच, शेख सोहेल शेख सलीम याच्याकडे अवैध शस्त्र असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने त्याला हनुमान घाट येथून ताब्यात घेतले. त्याला अवैध शस्त्राबाबत विचारपूस केली असता, त्याने हनुमान घाट येथील घरात शस्त्र ठेवल्याचे सांगितले.
त्याच्या घराची झडती घेतली असता, ५०० रुपये किमतीची खंजीर, ४०० रुपये किंमतीचा चाकू, दोन हजार रुपये किंमतीच्या दोन एअर गण जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी सुधीर वाघमारे यांच्या फिर्यादीवरून संशयित शेख सोहेल शेख सलीम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पोउपनि. प्रमोद बोंडले, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, पोहेकॉ. विनोद गडदे, कृष्णा तंगे, कृष्णा चौधरी, पोहेकॉ. फुलचंद गव्हाणे, पोकॉ. चेके, पोकॉ. योगेश सहाने, शडमल्लू यांनी केली आहे.