६३ हजार प्रवाशांचा रोज बसने प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:34 AM2020-01-12T00:34:19+5:302020-01-12T00:34:43+5:30
द्यस्थितीत जालना विभागातील बसमधून दररोज सरासरी ६३ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत.
विकास व्होरकटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लालपरीचा प्रवास आजही सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जात आहे. त्यामुळे आजही लालपरीने प्रवास करण्याला अनेक जण प्राधान्य देतात. सद्यस्थितीत जालना विभागातील बसमधून दररोज सरासरी ६३ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. यातून महामंडळाला दररोज सरासरी २२. ५० लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त होत आहे.
‘एसटी प्रवास- सुखाचा प्रवास’ असे ब्रीदवाक्य घेऊन लालपरी दिवस- रात्र प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्याने धावत आहे. जालना विभागात एकूण २५० बस आहेत. या बसचे महामंडाळाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे नेहमी योग्यरित्या नियोजन केले जाते. यात काळानुरूप बसमध्ये बदल करून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आजही ग्रामीण भागामध्ये उशिराने जाईन, पण लाल डब्यानेच जाईल, असे बोलले जाते.
एसटी. महामंडळ नेहमी तोट्यात चालले असल्याचा गवगवा सर्वत्र केला जात आहे. यावर मात्र, जालना विभागाने पर्याय शोधला आहे.
अवैध वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नेहमी उपाय- योजना केल्या जातात. ज्या मार्गावर अधिक वाहतूक आहे. त्या मार्गावर अधिक बसेस सोडल्या जातात. आजरोजी जिल्ह्यातील २५० बसमधून नियमित सरासरी ६३ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. यातून महामंडळाला सरासरी २२.५० लाख रूपयांचे उत्पन्न दररोज प्राप्त होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सर्वाधिक प्रवासी जालना आगारात
जिल्ह्यातील सर्वच आगारांपैकी सर्वाधिक प्रवासी जालना आगारातून प्रवास करीत आहेत. या आगारातील बसमधून जवळपास १९ हजार प्रवासी नियमित प्रवास करीत आहेत. या पाठोपाठ अंबड आगारातील बसमधून प्रवास करण्याला प्रवासी पसंती देत असल्याचे दिसून येते. या आगारातील बसमधून १८ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. जाफराबाद आगारातील बसमधून १७ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. तर सर्वात कमी परतूर आगारातील बसमधून ९ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत.
१९ हजार १०६ विद्यार्थ्यांचे ‘अपडाऊन’
आजच्या आधुनिक युगातही ग्रामीण भागामध्ये उच्च शिक्षणाची सोय नाही. त्यामुळे जवळपास १९ हजार १०६ विद्यार्थी शिक्षणासाठी बसने ‘अपडाऊन’ करीत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी बसचे पासेस काढलेले आहेत. यातून महामंडळाला महिन्याकाठी जवळपास एक कोटीहून अधिक उत्पन्न प्राप्त होत आहे.