डाळ स्वस्त होणार; खतांच्या दरात मोठी तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:28 AM2021-05-17T04:28:48+5:302021-05-17T04:28:48+5:30

जालना : सध्या बाजारपेठेत ग्राहकांचा प्रतिसाद अल्प असून, खाद्यतेल वगळता बहुतांश धान्य व किराणा वस्तुमालांचे दर स्थिर आहेत. या ...

Dal will be cheaper; Big rise in fertilizer prices | डाळ स्वस्त होणार; खतांच्या दरात मोठी तेजी

डाळ स्वस्त होणार; खतांच्या दरात मोठी तेजी

googlenewsNext

जालना : सध्या बाजारपेठेत ग्राहकांचा प्रतिसाद अल्प असून, खाद्यतेल वगळता बहुतांश धान्य व किराणा वस्तुमालांचे दर स्थिर आहेत. या वर्षी खतांचे दर ५० टक्क्यांनी वाढल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

डाळीच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने तूर, उडीद आणि मुगाच्या आयातीवर काही काळासाठी सवलत दिली आहे. या निर्णयामुळे तूर, उडद आणि मूग डाळ स्वस्त होण्याची शक्यता आहे. सोयाबीन कच्चे तेल, तसेच सीपीओ आणि पामोलिनच्या आयात शुल्कामध्ये शुक्रवारी क्विंटलमागे १५० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे खाद्यतेल आणखी महागणार आहे. सध्या पामतेलाचे दर १४,७००, सूर्यफूल तेल १८,०००, सरकी तेल आणि सोयाबीन तेलाचे दर प्रत्येकी १६,००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. पुढील महिन्यात पावसाळा सुरू होणार असल्याने बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. या वर्षी खताच्या दरांमध्ये तेजी असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा माल महागल्यामुळे खतांच्या किमतीत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक भाववाढ झाल्याचे बोलले जाते. फॉस्फेट आणि पोटाशच्या तेजीमधून दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांना सबसिडी देण्याचा विचार सरकार करत आहे. सबसिडी मिळाल्यास शेतकऱ्यांना खत स्वस्त दरात मिळेल, असे बोलले जाते. सध्या इफको खतांच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. पूर्वी १,१७५ तर यंदा १,७७५ रुपयांना खत मिळणार आहे. आयपीएल खतांच्या दरात ७०० रुपयांची वाढ होऊन, १,२०० ऐवजी १,९०० रुपयांना मिळणार आहे. महाधन खतामध्ये ६५० रुपयांची वाढ झाली असून, १,२७५ ऐवजी १,९२५ रुपयांना मिळणार आहे. जीएसएफसी (सरदार) खतामध्ये ६०० रुपयांची वाढ झाली आहे. १,१७५ ऐवजी १,७७५ रुपयांना मिळणार आहे. सुपर फॉस्फेट खतामध्ये १०० रुपयांची तेजी आली आहे. ४०० ऐवजी ५०० रुपयांना मिळणार आहे, अशी माहिती अभिषेक जैन आणि धनाजी गारखेडे यांनी दिली.

गव्हाची आवक दररोज १ हजार पोते

गव्हाची आवक दररोज १ हजार पोते असून, भाव १,७५० ते २,५०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. ज्वारीची आवक दररोज ७०० पोते इतकी असून, भाव १,४०० ते ३,००० रुपये प्रतिक्विंटल आहेत. बाजरीची आवक दररोज ३०० पोते असून, भाव १,२०० ते १,४०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. उन्हाळी मुगाची आवक दररोज २५ पोते इतकी असून, भाव ५,००० ते ६,००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. सूर्यफुलाची आवक दररोज १०० पोते इतकी असून, ५,६०० ते ६,००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. सोयाबीनची आवक दररोज ३०० पोते इतकी असून, भाव ७,३०० ते ७,५०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. तुरीची आवक दररोज १०० पोते इतकी असून, भाव ६,३०० ते ६,९०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. हरभऱ्याची आवक ७०० पोते असून, भाव ४,७०० ते ४,९५० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

Web Title: Dal will be cheaper; Big rise in fertilizer prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.