लोकसहभागातून साडेचार लाख रुपये गोळा करून दुरुस्त केला बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:47 AM2019-11-20T00:47:08+5:302019-11-20T00:47:32+5:30
पाणी वाहून गेल्याने जैनपूर कठोरा येथील शेतकऱ्यांनी शासनाची वाट न पाहता ४ लाख ५० हजार रूपये जमा करून या फुटलेल्या बंधा-यामध्ये माती व मुरूमाचा भराव भरून पाणी अडविले आहे.
फकिरा देशमुुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भोकरदन तालुक्यातील पूर्णा नदीला परतीच्या पावसामुळे आलेल्या महापुरात १२ बंधारे फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले. पाणी वाहून गेल्याने जैनपूर कठोरा येथील शेतकऱ्यांनी शासनाची वाट न पाहता लोकसभागातून ४ लाख ५० हजार रूपये जमा करून या फुटलेल्या बंधा-यामध्ये माती व मुरूमाचा भराव भरून पाणी अडविले आहे. या पाण्याचा परिसरातील २०० हेक्टर सिंचनाला फायदा होणार आहे़
आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे तालुक्यातील सर्वच नद्यांना महापूर आला होता. या पुरामुळे पूर्णा, जुई, गिरजा, रायघोळ, धामणा या नद्यांवरील १२ ते १५ कोल्हापुरी बंधारे फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले. बंधाºयातील पाणी वाहून गेल्याने रबी हंगाम धोक्यात आला आहे. बंधारे फुटल्यानंतर मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने पंचनामे करून दुरूस्तीसाठीचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला.
मात्र, त्याला मंजुरी कधी मिळेल व काम कधी होणार याची वाट न बघता जैनपूर - कठोरा येथील सोनाजी दांडगे, हरिदास कोठाळे, बंडू पाटील, रामकिसन कोठाळे, बाबूराव सोनोने, बिसन जाधव, आप्पा कोठाळे, रामदास रोडे, विठ्ठल रोडे, सुधाकर रोडे, रत्नाकर रोडे यांनी या बंधा-याचा लाभ मिळणा-या सर्व शेतकऱ्यांची बैठक घेतली.
बैठकीत प्रत्येक शेतक-याने ३ हजार रुपयांची वर्गणी जमा करण्याचा निर्णय घेतला. सर्व शेतकºयांनी दिलेल्या वर्गणीतून ४ लाख रुपये जमा झाले. पोकलँन, जेसीबी व तीन टिप्परच्या माध्यामातून फुटलेल्या बंधा-याच्या वाहून गेलेल्या भागात माती व मुरूमाचा भराव टाकला. त्याला आतल्या बाजूने प्लॅस्टिकची पन्नी लावण्यात आली.पाणी व माती वाहून जाणार नाही याची देखील काळजी घेण्यात आली. यामुळे ७९३ सघमी. पाणी अडविण्यात आले आहे. त्यामुळे या पाण्याचा २०० हेक्टर क्षेत्राला लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले.