‘त्या’ खत कंपन्यांची कसून चौकशी व्हावी- दमानिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 01:10 AM2019-05-10T01:10:09+5:302019-05-10T01:10:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : काही खत उत्पादक कंपन्या सेंद्रिय खतनिर्मिती करताना बनवाट साहित्याचा वापर करून शेतकऱ्यांच्या माथी काहीही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : काही खत उत्पादक कंपन्या सेंद्रिय खतनिर्मिती करताना बनवाट साहित्याचा वापर करून शेतकऱ्यांच्या माथी काहीही मारत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून, नांदेड येथील खत कंपनीच्या मालसह अन्य खत उत्पादन करणाºया कारखान्यांची कसून चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाव्दारे केली.
बुधवारी दमानिया या परतूर येथील न्यायालयीन कामासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. तसेच जिल्हाधिका-यांची भेट घेऊन निवेदन दिले. गेल्याच आठवड्यात जालन्यातील दोन खत उत्पादन करणा-या कंपन्यांमध्ये बोगस साहित्याचा वापर करून सेंद्रिय खत असल्याचे भासवले जात होते.
या संदर्भात कृषी विभागानेच कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित कंपन्यांच्या प्रयोगशाळांचे तसेच त्यांनी उत्पादीत केलेल्या सर्व खतांचे सँपल घेऊन त्याची उच्चस्तरीय तपासणी व्हावी अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी राजलक्ष्मी, राधागोविंद, उज्वल, किसान शक्ती, उज्ज्वल बिलेट, सूरजवर्षा इंडट्री आदी कंपन्यांची यादी निवेदनासोबत दिली आहे. या सर्व कंपन्यांवर नांदेड येथील एक बडा उद्योजक संचालक म्हणून कार्य करतो. असेही त्यांनी सांगितले. एकूणच जालन्यातील सिडको प्रकल्पाच्या ज्या जमिनी राजकीय वर्तुळातील जवळच्या व्यक्तींनी खरेदी केल्या आहेत. त्याची चौकशी व्हावी असेही दमानिया यांनी यावेळी सांगितले. त्या जमिनींचे व्यवहार रद्द करून त्या मूळ मालकांना देण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली. परतूर येथील बागेश्वरी कारखान्याच्या व्यवस्थापनावर दमानिया यांनी काही वर्षांपूर्वी गंभीर आरोप केले केले होते, त्या आरोपा बाबत दमानिया यांना बागेश्वरीच्या प्रशासनाने न्यायालयात ओढले आहे. या संदर्भातील खटल्याची सुनावणी गुरूवारी होती, त्यासाठी त्या परतूर येथे आल्या होत्या. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही १७ जुलैला होणार आहे. यावेळी कैलास फुलारी आदी उपस्थित होते.