दानवे, खोतकर बंधूची ‘डिनर डिप्लोमसी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 12:09 AM2019-12-28T00:09:44+5:302019-12-28T00:10:49+5:30
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदा संदर्भातील महाविकास आघाडीच्या जोरबैठका सुरू आहेत. असे असतांनाच गुरूवारी रात्री शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी भोकरदन येथे जाऊन डिनर डिप्लोमसी केल्याने जिल्हाभरात चर्चेला उधाण आले आहे.
जालना/भोकरदन : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदा संदर्भातील महाविकास आघाडीच्या जोरबैठका सुरू आहेत. असे असतांनाच गुरूवारी रात्री शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी भोकरदन येथे जाऊन डिनर डिप्लोमसी केल्याने जिल्हाभरात चर्चेला उधाण आले आहे. सहा जानेवारीला जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे.
जालना जिल्हा परिषद आपल्याच ताब्यात राहावी म्हणून भाजपने कंबर कसली आहे. तर काही दगाफटका होऊ नये म्हणून दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते सतर्क झाले असून, जवळपास सर्वच पक्षांचे सदस्य आता सहलीवर गेले आहेत. गुरूवारी महाविकास आघाडीच्या दुपारी झालेल्या बैठकीस अर्जुन खोतकर, अनिरूध्द खोतकर यांचीही उपस्थिती होती. या बैठकीस आ. राजेश टोपे, आ. कैलास गोरंट्याल, माजी आ. अरविंद चव्हाण, माजी आ, सुरेशकुमार जेथलिया, माजी आ. शिवाजी चोथे, जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉ. निसार देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांची दुपारी महाविकास आघाडीच्या बैठक झाली. या बैठकीत जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदावर शिवसेनेने दावा केला आहे. तर उपाध्यक्ष पदावरही त्यांचा दावा असून, चार सभापंतीमध्ये तीन राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक काँग्रेस अशी सभापती पदे घ्यावेत अशीही चर्चा झाली. परंतु या बद्दल अद्याप कुठलाच अंतिम निर्णय झाला नसल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
एकूणच भाजपचे सर्वात जास्त म्हणजे २२ सदस्य असतांनाही अडीच वर्षापूर्वी शिवसेनेने अचानक धोका देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संधान साधून अध्यक्षपदी अनिरूध्द खोतकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश टोपे यांची वर्णी लावली होती.
ही सल आजही भाजपच्या म्हणजेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या मनात कायम आहे. त्यातच लोकसभा निडणुकतही दानवे यांना अर्जुन खोतकरांनी मोठे आव्हान दिले होते. त्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना मध्यस्ती करावी लागली होती.
भाजपकडे ३१ सदस्य
दुसरीकडे भाजपने गुरूवारी रात्री काही सदस्यांना सहलीवर पाठवले होते. तर काही सदस्य शुक्रवारी दुपारी गेले. एका भाजपच्या सदस्याने सांगितले की, आमच्यासोबत एकूण ३१ सदस्य असून, सर्व सदस्य सहलीला गेले आहे. दरम्यान, जालना जिल्हा परिषदेत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांची सत्ता आहे.
महाविकासआघाडीला अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ६ जानेवारी रोजी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यासाठी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपच्या सर्व सदस्यांची भोकरदन येथे बैठक बोलली होती. बंद दरवाज्या आड झालेल्या या बैठकीत काय चर्चा झाले हे कळू शकले नाही.