सांबरेंची नाराजी दूर करण्यासाठी दानवे, खोतकरांची ‘चाय पे चर्चा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 12:59 AM2019-04-07T00:59:20+5:302019-04-07T00:59:49+5:30
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांना युतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेना नेत्यांची मनधरणी करण्यातच अर्धावेळ खर्च होतानाचे चित्र आहे.
जालना : भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांना युतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेना नेत्यांची मनधरणी करण्यातच अर्धावेळ खर्च होतानाचे चित्र आहे. पूर्वी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची मनधरणी करताना बराचा कालावधी खर्ची गेला. आणि आता बदनापूरचे माजी आ. संतोष सांबरे यांनी दोन दिवसांपूर्वी बदनापूर येथे झालेल्या शिवसैनिकांच्या बैठकीत खा. दानवेंसह आ. नारायण कुचे यांच्या कामकाजाच्या पध्दतीवर नाराजीचा सूर आळवला होता. याची कुणकुण दानवेंना न लागल्यास नवल. त्यांनी लगेचच गुढी पाडव्याचे निमित्त साधून शनिवारी सांबरेंचे निवासस्थान गाठून चाय पे चर्चा केली.
या बैठकीत कुचे यांच्या कार्यशैली बाबत चर्चा होऊन यापुढे सर्व निर्णय हे सांबरेंशी चर्चा करून घेतले जातील असे आश्वासन यावेळी नेत्यांनी सांबरेंना दिले. गुढी पाडवा असल्याने सांबरे यांनी देखील या सर्व ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे ऐकून नाराजी दूर झाल्याचे सांगून दानवेंसह अन्य नेत्यांचे पेढे भरवून तोंड गोड करून राजकीय पाडवा गोड केला. या दानवेंच्या भेटीची दिवसभर जालन्यातील राजकीय वर्तुळात चर्चा होती.
संतोष सांबरे हे बदनापूरचे शिवसेनेचे माजी आमदार राहिले आहेत. ते यापूर्वी जालना पालिकेचे दोन वेळेस नगरसेवक होते. लोकसभा निवडणुकीत दानवे कुठलाच धोका पत्कारण्यास तयार नाहीत. त्यामुळे नाराजांची नाराजी दूर करण्याचे कसब दानवेंना चांगलेच माहीत आहे. त्यांनी शनिवारी सकाळी साडेआठ वाजताच सांबरेंचे निवासस्थान गाठले. त्याच वेळी त्यांनी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. नारायण कुचे, जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनाही पाचारण केले.