धाडस ! अस्वलाच्या हल्ल्यात जखमी असतानाही दहावीच्या विद्यार्थ्याने केला जोरदार प्रतिकार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 04:06 PM2018-03-20T16:06:38+5:302018-03-20T16:06:38+5:30

धनगरवाडी परिसरातील फुले नगर येथे एका दहावीच्या विद्यार्थ्यावर अस्वलाने मागून हल्ला केला. मात्र त्याने धाडस दाखवत अस्वलाच्या हल्ल्याचा जोरदार प्रतिकार करत स्वतः जीव वाचवला.  

Dare! A Class X student sustained severe injuries while being injured in bear attack | धाडस ! अस्वलाच्या हल्ल्यात जखमी असतानाही दहावीच्या विद्यार्थ्याने केला जोरदार प्रतिकार  

धाडस ! अस्वलाच्या हल्ल्यात जखमी असतानाही दहावीच्या विद्यार्थ्याने केला जोरदार प्रतिकार  

Next

जालना : भोकरदन शहरातील धनगरवाडी परिसरातील फुले नगर येथे एका दहावीच्या विद्यार्थ्यावर अस्वलाने मागून हल्ला केला. मात्र त्याने धाडस दाखवत अस्वलाच्या हल्ल्याचा जोरदार प्रतिकार करत स्वतः जीव वाचवला.  

याबाबत प्रत्यक्षदर्शिंच्या माहिती नुसार, आदिनाथ सपकाळ हा त्याचे वडील व आणखी दोघांसोबत धनगरवाडी परिसरातील फुले नगर येथे सकाळी शेतात गेला होता. शेतातील त्याचे काम होताच तो दहावीची परीक्षा असल्याने घराकडे निघाला. शेतापासून काही अंतर पार करताच त्यावर अचानक  मागच्या बाजूने अस्वलाने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने आदिनाथ खाली पडला तेव्हा अस्वलाने त्याच्या मांडीचा चावा घेतला. त्यानंतर अस्वलाने आदिनाथच्या गळ्याचा चावा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्ल्यातून स्वतःस  सावरत आदिनाथने मदतीसाठी आवाज देत आजूबाजूचे काही हातात लागते का ते चाचपडून पाहिले. यातच त्याच्या हाताला एक दगड लागला, त्याने पूर्ण शक्ती एकवटून त्या दगडाने अस्वलाच्या तोंडावर हल्ला चढवला. दगडाच्या फटक्याने अस्वल काही काळासाठी बाजूला झाले,तेव्हा आदिनाथचा आवाज ऐकून मागून धावत आलेल्या गणेश सपकाळ याने अस्वलाला काठीने मारत तेथून हुसकवून लावले. यानंतर आदिनाथवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. आदिनाथच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

अस्वलाचा आणखी दोघांवर हल्ला 
धनगरवाडी येथून हुसकवून लावलेल्या अस्वलास पकडण्यासाठी गावकऱ्यांनी त्याचा पाठलाग केला. तेव्हा ते आयटीआय कॉलेज कडून जोमाळा शिवारातून फत्तेपूर येथे पोहचले. येथे सुद्धा अस्वलाने रुख्मनबाई तळेकर व शिवम गायकवाड यांचावर हल्ला करून जखमी केले. यात गंभीर जखमी असलेल्या शिवमला अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान दोन्ही ठिकाणच्या हल्ल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. यानंतर वन विभागाचे एक पथक या अस्वलाला पकडण्याच्या प्रयत्नात आहे. 

Web Title: Dare! A Class X student sustained severe injuries while being injured in bear attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.