टेंभुर्णी येथील दत्त यात्रा साध्या पद्धतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:16 AM2020-12-28T04:16:50+5:302020-12-28T04:16:50+5:30
टेंभुर्णी- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णीची ऐतिहासिक दत्त यात्रा प्रथमच साध्या पद्धतीने साजरी होणार आहे. यावर्षी धार्मिक कार्यक्रम वगळता अन्य सर्व ...
टेंभुर्णी- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णीची ऐतिहासिक दत्त यात्रा प्रथमच साध्या पद्धतीने साजरी होणार आहे. यावर्षी धार्मिक कार्यक्रम वगळता अन्य सर्व यात्राैत्सव रद्द केल्याने व्यापाऱ्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान सोशल डिस्टन्सचा वापर करून यात्रेत दुकाने थाटण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांतून केली जात आहे.
टेंभुर्णी येथील ऐतिहासिक दत्त यात्रेला जवळपास ५० वर्षांची परंपरा आहे. एकेकाळी या यात्रेत भरणाऱ्या बैलजोड्यांच्या शंकरपटामुळे ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होती. मात्र मागील काही वर्षात शंकरपटांंवर बंदी आल्यामुळे यात्रेची रौनक थोडी कमी झाली असली तरी यात्रेत येणारी विविध दुकाने, रहाटपाळणे, तमाशा व टुरिंग टॉकीज यामुळे या यात्रेची पंचक्रोशीतील जनतेला उत्सुकता लागून असते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आठ महिन्यांपासून सर्वच यात्राैत्सव रद्द केले गेल्याने डिसेंबर अखेर भरणारी ही यात्राही रद्द झाल्याने छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसह भाविक भक्तांची घोर निराशा झाली आहे. यावर्षी यात्रेत केवळ धार्मिक कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे यात्रा कमिटीने कळविले आहे.
असे होणार धार्मिक कार्यक्रम
२३ ते २९ डिसेंबरदरम्यान सप्ताह व गुरूचरित्र वाचन, दत्त जन्माचे प्रवचन, मंदिर परिसरात पालखी सोहळा, काला, दहिहंडी, प्रवचन आदी कार्यक्रम होणार आहे.
मागील आठ महिन्यांपासून यात्राैत्सवांवर बंदी आल्यामुळे आमच्या सारख्या अनेक छोट्या व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले आहे. एरवी आठवडे बाजार हाऊस फुल्ल भरत असतानाच यात्रांवरच बंदी कशाला ? येथील दत्त मंदिर परिसरात प्रशस्त प्रांगण असल्याने सोशल डिस्टन्सचा वापर करून दुकानी लावल्या जावू शकतात. निदान स्थानिक व्यावसायिकांना तरी यात्रेत दुकाने लावण्याची परवानगी द्यावी.
केदार शर्मा, मिठाई व्यावसायिक, टेंभुर्णी
सध्या कोरोनाची तीव्रता कमी झाली असल्याने सोशल डिस्टन्सचा वापर करून यात्रा भरू द्यावी अशी आमची इच्छा होती. त्याबाबत आम्ही जाफराबाद चे तहसीलदार सतीश सोनी यांच्याशीही संपर्क साधला. मात्र यात्रेला परवानगी नसल्याचे त्यांनी सांगितल्याने आमचा नाईलाज झाला आहे.
देवराव देशमुख, अध्यक्ष, यात्रा कमेटी, टेंभुर्णी.
फोटो- टेंभुर्णी येथील दत्तयात्रेचे मागील वर्षाचे छायाचित्र.