रुग्णांना ऑक्सिजन मिळण्यासाठी २२ कामगारांचे अहोरात्र जागरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:31 AM2021-05-07T04:31:33+5:302021-05-07T04:31:33+5:30
बुधवारी जालन्यातील या ऑक्सिजन प्लांटला भेट दिली असता, तेथील अभियंता चंद्रकेशन प्रसाद यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ...
बुधवारी जालन्यातील या ऑक्सिजन प्लांटला भेट दिली असता, तेथील अभियंता चंद्रकेशन प्रसाद यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही जवळपास २२ ते २५ कर्मचारी आहोत. ते सलग तीन शिप्टमध्ये काम करत आहोत. त्यामुळे ऑक्सिजन निर्मिती ही एक तासही बंद राहिलेली नाही. काही तांत्रिक बिघाड आणि विद्युत पुरवठा खंडित झाल्यास हा प्लांट बंद होता; परंतु आता तर आम्हाला जेवायलाही वेळ नसल्याचे ते म्हणाले. आमच्या माध्यमातूनच जालन्यातील कोविड केअर सेंटरसह जिल्हा रुग्णालयात दोन २० के.एल.चे टँक बांधले आहेत. त्यात लिक्विड ऑक्सिजनचा साठा तर होतोच; परंतु अत्यंत आणीबाणीच्या स्थितीत सिलिंडरनेही गंभीर रुग्णांना ऑक्सिजन देण्यात येत आहे. आज कोविडसह अन्य रुग्णालयातील ऑक्सिजनच्या खाटा वाढविल्या आहेत. त्यामुळेदेखील ऑक्सिजनचा पुरवठा करताना मोठी अडचण येत आहे.
चौकट
दररोजचे ३०० सिलिंडर उत्पादन
जालन्यातील या प्लांटमध्ये मोठ्या काँप्रेसरने वातावरणातील हवा शोषली जाते. या शाेषलेल्या हवेतून नायट्रोजनसह अन्य वायुरूप पदार्थ वेगळे करून शुध्द ऑक्सिजन प्रोसेस करून मिळविला जातो. हा ऑक्सिजन मिळविण्यासाठी जवळपास उणे १९५ तापमान मेंटेन करावे लागत असल्याचे चंद्रशेख प्रसाद यांनी नमूद केले.
एडीएमकडून पाहणी
दरम्यान, गुरुवारी जालन्याचे उपविभागीय अधिकारी संदीपान सानप तसेच शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील तज्ज्ञ डॉ. जायभाये यांनीदेखील या प्लांटला भेट देऊन संजय अग्रवाल यांच्यासोबत चर्चा केली. विशेष म्हणजे सानप व जायभाये यांनी पुढील दोन महिन्यांचे नियोजन कसे करता येईल, यासाठी काय केले पाहिजे, याबाबत चर्चा करून तशा तांत्रिक सुधारणा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, अपर जिल्हाधिकारी अनंत पिनाटे यांनी दिल्याचे सानप यांनी सांगितले.