मतदान सुरू असताना उमेदवाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:35 AM2021-01-16T04:35:48+5:302021-01-16T04:35:48+5:30
भोकरदन/राजूर (जालना) : ग्रामपंचायत निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू असतानाच, एका ६० वर्षीय उमेदवाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ...
भोकरदन/राजूर (जालना) : ग्रामपंचायत निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू असतानाच, एका ६० वर्षीय उमेदवाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी कोठा दाभाडी (ता. भोकरदन) येथे घडली. विशेष म्हणजे, दुपारच्या सुमारास मतदान सुरू असताना मतदान केंद्राच्या पाठीमागील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रभाकर दादाराव शेजूळ (६०) असे मृत उमेदवाराचे नाव आहे. कोठा दाभाडी ग्रामपंचायतीतील सातपैकी एक जागा बिनविरोध निघाली आहे. उर्वरित सहा जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यातील राजुरेश्वर ग्रामविकास पॅनेलमधून वाॅर्ड क्रमांक एकमधून माजी सरपंच प्रभाकर शेजूळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शेजूळ यांच्यासह समर्थकांनी प्रचार यंत्रणाही जोमात राबविली होती. शुक्रवारी सकाळी मतदान प्रक्रिया होणार असल्याने शेजूळ यांनी सकाळी लवकरच मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर मतदान प्रक्रियेत ते सहभागी झाले होते. परंतु, त्याचवेळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना तात्काळ जालना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर दुपारी ४ वाजण्याच्यासुमारास मतदान प्रक्रिया सुरू असताना, मतदान केंद्राच्या पाठीमागे असलेल्या तळ्याजवळील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, आई- वडील असा परिवार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत उभ्या असलेल्या माजी सरपंचांचे हृदयविकाराने निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
चौकट
सुरू झालेली मतदान प्रक्रिया थांबविता येत नसल्याने प्रशासनाच्यावतीने त्या वाॅर्डातील मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या घटनेची निवडणूक आयोगाला माहिती दिली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या जागेचा निकाल जाहीर केला जाईल, असे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष गोरड यांनी सांगितले.