जाफराबादमध्ये वीजेचा शॉक लागून आजी-नातीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 07:02 PM2019-04-19T19:02:31+5:302019-04-19T19:05:11+5:30
चारचाकीत उतरला विद्युत प्रवाह
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील देवगाव उगले येथील मंगलादेवीच्या यात्रेत देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या अनुसयाबाई शंकर साबळे (६०) व अश्विनी नंदू साबळे (१८) या आजी आणि नातीचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमार घडली आहे. त्यांच्या सोबत असलेल्या शारदा भाऊसाहेब कांबळे ( ३२ ) (रा. पिंपळखुटा) ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार जाफराबाद येथे करण्यात येऊन पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे.
देऊळगाव ऊगले येथे दरवर्षी जय महाकाली मंगला देवीची यात्रा उत्सवा निमित्य परीसरातील हजारो भावीक भक्तगण दर्शनासाठी येत असतात, यात्रे निमित्त भक्तांच्या मनोरंजनासाठी रात्री समाज प्रबोधन व कथेचे आयोजन या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे करण्यात आले होते. देवीचे दर्शन आणि कथा, कार्यक्रम पाहण्यासाठी आजी नातवासह स्वत:च्या बँडपार्टीच्या गाडीत बसून आल्या होत्या. मध्येच ही दुदैर्वी घटना घडली आहे.
कथेच्या निमीत्ताने गर्दी असल्याने रिकाम्या जागेत बँण्ड पार्टीची चारचाकी बाजूला लावत असताना मुख्य तारांचा विधुत प्रवाहाची लाईनला गाडीचा वरच्या बाजुने स्पर्श होवुन गाडीत विद्युतप्रवाह उतरला. यानंतर गाडीत बसलेल्या आजी अनुसयाबाई साबळे, व अश्विनी साबळे या दोघींना विजेचा जबर शॉक लागला. यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर शारदा कांबळे ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत.