विष घेतलेल्या पतीचा मृत्यू; पत्नी चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:50 AM2019-09-01T00:50:30+5:302019-09-01T00:51:05+5:30
एका दाम्पत्याने शनिवारी सायंकाळी राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले. पतीचा जागीच मृत्यू असून, त्याच्या पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भोकरदन शहरातील पोस्ट आॅफिस भागात राहणाऱ्या एका दाम्पत्याने शनिवारी सायंकाळी राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले. या घटनेत पतीचा जागीच मृत्यू असून, त्याच्या पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे. संबंधित महिलेला उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले.
भगवान पुंजाजी मोरे (५५) असे मयताचे नाव आहे. भोकरदन तालुक्यातील नांजा येथील भगवान मोरे हे भोकरदन शहरातील एका शेतक-याकडे सालगडी म्हणून कामाला होते. शहरातील पोस्ट कार्यालयाच्या बाजूला किरायाने घेतलेल्या एका खोलीत पत्नी लक्ष्मीबाई (४५) यांच्या समवेत ते राहत होते. शनिवारी शहरातील आठवडी बाजार असल्याने भगवान मोरे हे बाजारात गेले होते. ते घरी परतल्यानंतर पत्नी लक्ष्मीबाई यांच्यासमवेत शाब्दिक बाचाबाची झाली. काही काळानंतर त्यांच्यातील भांडण थांबले. मात्र, बराच वेळ झाला तरी घरातून आवाज येत नसल्याने त्यांच्या घराशेजारी राहणा-या एकाने दरवाजा उघडला. त्यावेळी मोरे दाम्पत्य एकमेकांजवळ शांत बसलेले दिसून आले. मात्र, परिस्थिती वेगळीच असल्याचा संशय आल्याने त्या युवकाने इतरांना बोलावून घेतले. नागरिकांनी पाहणी केली असता भगवान मोरे हे मयत झाल्याचे दिसून आले. तर लक्ष्मीबाई या बेशुध्द अवस्थेत दिसून आल्या. नागरिकांनी तात्काळ त्यांना खासगी रिक्षातून ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉ. एस. एस. म्हेत्रे यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबादकडे पाठवून दिले.
घटनेची माहिती मिळताच बीट जमादार डी.जे. शिंदे, बी.एल.राठोड यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, त्या दाम्पत्याने विष कोणत्या कारणाने घेतले, हे उशिरापर्यंत समजू शकले नाही. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पार्थिव ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले.या दाम्पत्यास एक मुलगा, तीन मुली आहेत.