निष्काळजीपणामुळेच प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू; महिला डॉक्टरवर गुन्हा दाखल
By दिपक ढोले | Published: August 6, 2022 05:43 PM2022-08-06T17:43:15+5:302022-08-06T17:43:41+5:30
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तज्ञ डाॅक्टरांची समिती स्थापन करण्यात आली होती.
जालना : प्रसूती दरम्यान रक्तस्त्राव होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना जालना शहरातील दरगड हॉस्पीटलमध्ये १३ एप्रिल २०२२ रोजी घडली होती. या प्रकरणाचा अहवाल आल्यानंतर शुक्रवारी दरगड हॉस्पीटलमधील महिला डॉक्टरवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देऊळगाव राजा शहरातील गजानन नगर येथील रहिवासी विकास लिधोरीया यांच्या पत्नीला १३ एप्रिल २०२२ रोजी जालना शहरातील दरगड हॉस्पीटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल केले होते. प्रसूतीनंतर त्यांना रक्ताची गरज असतांनाही महिला डॉक्टरांनी नातेवाईकांना रक्त आणण्यास सांगितले नाही. शिवाय, स्वत: ही रक्ताची व्यवस्था केली नाही. प्रसूती झाल्यानंतर त्यांना रक्तस्त्राव होत होता. तो सुध्दा थांबविण्यात आला नाही. त्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला.
नातेवाईकांनी याची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केले. प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तज्ञ डाॅक्टरांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने नुकताच अहवाल दिला असून, त्यात महिलेचा मृत्यू हा रक्तस्त्रावामुळे झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. शिवाय, डॉक्टरांनी हयगय व निष्काळजीपणा केल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी विकास लिधोरीया यांच्या फिर्यादीवरून दरगड हॉस्पीटलमधील महिला डॉक्टराविरुध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोउपनि. चाटे हे करीत आहेत.