विद्युत प्रवाहापासून आईला वाचविताना एकुलत्या मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:43 PM2019-08-20T12:43:18+5:302019-08-20T12:45:31+5:30
घरासमोरील लोखंडी गेटमध्ये उतरला होता विद्युतप्रवाह
भोकरदन/ केदारखेडा (जालना) : घरासमोरील लोखंडी गेटमध्ये उतरलेल्या वीजप्रवाहामुळे गेटला चिकटलेल्या आईला वाचविण्याच्या प्रयत्नात जगन बबन राऊत (२४) या युवकाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथे सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
जगन राऊत हा कुटुंबासह शेतात राहत होता. सोमवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास त्याची आई अलकाबाई राऊत या नेहमीप्रमाणे काम करीत होत्या. काम करीत असताना लोखंडी गेट उघडून त्या बाहेर जात होत्या. मात्र, लोखंडी गेटमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्यांना विद्युत धक्का लागला आणि त्या गेटला चिटकल्या. आईच्या ओरडल्याचा आवाज ऐकू येताच जगन घराबाहेर धावत आला. गेटला चिटकलेल्या आईला गेटपासून दूर केले. मात्र, तो गेटला चिटकला विजेचा धक्का लागून यातच जगन राऊतचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी असा परिवार आहे.
चार महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह
जगन राऊत याच्या जन्मापूर्वीच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. आईने एकुलत्या एक मुलाला लहानाचे मोठे केले होते. जगनचा मागील चार महिन्यांपूर्वी १० एप्रिल रोजी विवाह झाला होता.