महामार्ग नव्हे मृत्यूचे सापळे ! राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर मागील दहा महिन्यांत १२१ अपघातात ७२ जणांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 03:41 PM2020-11-06T15:41:58+5:302020-11-06T15:43:42+5:30
जालना- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे, जालना- बीड महामार्गाचे संथगतीने सुरू असलेले काम आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांची अवस्था बिकट झाली आहे.
जालना : कोरोनामुळे खाजगी आणि शासकीय प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक जण खाजगी वाहनांचा वापर करीत प्रवास करीत असून, रस्ता अपघातात वाढ होत आहे. चालू वर्षात जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य महामार्गावर १२१ अपघात झाले आहेत. त्यात ७२ जणांचा बळी गेला असून, ११२ जण गंभीर जखमी झाले आहेत.
जालना- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे, जालना- बीड महामार्गाचे संथगतीने सुरू असलेले काम आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांची अवस्था बिकट झाली आहे. कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर बंदी आणण्यात आली होती. कोरोनापूर्वी जानेवारीत जिल्ह्यातील महामार्गावर १७ अपघात झाले आहेत. १२ जणांचा बळी गेला असून, १९ जण गंभीर जखमी झाले. फेब्रुवारी महिन्यातही १७ अपघात झाले. या अपघातांमध्ये १२ जणांचा बळी गेला असून, आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आले; परंतु राष्ट्रीय, राज्य महामार्गावरील अपघाताचे सत्र कायम राहिले.
मार्च महिन्यात १३ अपघात झाले. या अपघातात सहा जणांचा बळी गेला, तर २३ जण गंभीर जखमी झाले. एप्रिल महिन्यात झालेल्या तीन अपघातांत तिघांचा बळी गेला आहे. मे महिन्यात १० अपघात झाले आहेत. या अपघातांत पाच जणांचा बळी गेला आहे, तर १३ जण गंभीर जखमी झाले. जून महिन्यात ११ अपघात झाले. या अपघातात सहा जणांचा बळी गेला, तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. जुलै महिन्यात १४ अपघात झाले असून, त्यात नऊ जणांचा बळी गेला आहे, तर १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात ११ अपघात झाले असून, त्यात सात जणांचा बळी गेला आहे, तर सात जण गंभीर जखमी झाले.
सप्टेंबर महिन्यातही ११ अपघात झाले. यात पाच जणांचा बळी गेला असून, सात जण गंभीर जखमी झाले आहेत, तर ऑक्टोबर महिन्यात १४ अपघात झाले आहेत. यात सात जणांचा बळी गेला असून, १० जण गंभीर जखमी झाले आहेत. एकूणच कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी महामार्गाची दुरवस्था आणि चालकांकडून वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे महामार्गावरील अपघाताचे सत्र सुरूच आहे.
खड्डे ठरतायत धोकादायक
जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय, राज्य महामार्गांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, हे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत, तर ज्या रस्त्यांची कामे सुरू आहेत तीही संथगतीने सुरू आहेत. अनेक ठिकाणी साईड पंखे नसल्यानेही अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे खड्डे बुजविण्याची गरज आहे.
नियमांचे पालन महत्त्वाचे
रस्ता अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. वेळोवेळी वाहनचालकांच्या बैठका घेऊन, कार्यक्रमांमध्येही समुपदेशन केले जाते. कारवाया करतानाही चालकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जातात. अपघाताचे सत्र कमी करण्यासाठी चालकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
-पोउपनि. हरेश्वर घुगे, महामार्ग पोलीस, जालना