केळना नदीच्या पात्रात अवैध वाळूचा उपसा करताना वाळूखाली दबून दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 02:02 PM2019-03-24T14:02:27+5:302019-03-24T14:08:22+5:30
गोकुळ शिवारातील केळनानदीच्या पात्रात अवैध वाळूचा उपसा करीत असताना दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.
भोकरदन - गोकुळ शिवारातील केळनानदीच्या पात्रात अवैध वाळूचा उपसा करीत असताना दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील गोकुळ येथील अनिकेत विक्रम तराळ (18) व योगेश कोंडीबा तराळवय (21) या दोन तरुणांचा 23 मार्च रोजी रात्री दहाच्या दरम्यान अवैध वाळूचा उपसा करीत असताना खड्ड्यात दबून गुदमरून मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 23 मार्च रोजी सायंकाळी गोकुळ येथील योगेश कोंडीबा तराळ, अनिकेत विक्रम तराळ, विष्णू तराळ, शिवाजी शेरकर, विष्णू शेरकर हे पाच जण केळना नदीच्या पात्रात वाहनांमध्ये अवैध वाळूचा उपसा करून वाळू भरत होते. ही वाळू भरताना दोघे ज्या खड्ड्यातून वाळू काढत होते त्याच खड्ड्यामध्ये कोसळले. अनिकेत तराळ व योगेश तरळ हे दोघे या वाळूत दबले गेल्यानंतर त्यांच्यासोबत असलेले तीन जण घाबरुन पळून गेले. मात्र एका लहान मुलाने गावात जाऊन दोन जण वाळू खाली दबल्याची माहिती दिली. त्यानंतर गावकरी घटनास्थळी गेले व या मुलांना बाहेर काढले मात्र तोपर्यंत दोघांचा गुदमरून मृत्यू झाला होता. या घटनेचा भोकरदन पोलिसांनी पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.