जालन्यात जमावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:01 AM2019-06-11T01:01:49+5:302019-06-11T01:04:36+5:30
जुन्या वादातून जालना येथील लोहार मोहल्ला परिसरात रविवारी रात्री १७ वर्षीय तरुणाला जमावाने बेदाम मारहाण केली, त्यात तो गंभीर जखमी झाला होता, उपचार सुरू असताना त्याचा मुत्यू झाला.
जालना : जुन्या वादातून जालना येथील लोहार मोहल्ला परिसरात रविवारी रात्री १७ वर्षीय तरुणाला जमावाने बेदाम मारहाण केली, त्यात तो गंभीर जखमी झाला होता, उपचार सुरू असताना त्याचा मुत्यू झाला. रोहित नारायण जाधव (१७) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी मयत तरुणाच्या आईच्या फिर्यादीवरुन सोमवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात २० जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी आठ जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे सोमवारी लोहार मोहल्ला परिसरात तणावाचे वातावरण होते. या प्रकरणात दोन महिलांसह आठ जणांना अटक करण्यात आली.
याप्रकरणी मजीद, अजीज, मोसीन, बशीर खान फतरी खान, इम्रान खान बशीर खान, तोफीक बब्बू, सलीम शेख रहीम, खय्युम, शेख यूनूस शेख महेबूब, महेबुब शेख युसूफ, शेख रियाज शेख जिलानी, शेख सलीम शेख रहीम, शेख रसूल शेख यूनुस, शेख रहीम शेख रईस, शेख अलीम शेख रईस, शेख मासूम शेख करीम, चार महिला (सर्व रा. लोहार मोहल्ला) यांच्याविरोध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना शहरातील बसस्थानक परिसरातील लोहार मोहल्ल्यात ६ जून रोजी रात्रीच्या वेळी झालेल्या घटनेमुळे त्या परिसरात तणावाची परिस्थीती होती. या परिसरात पोलीस बंदोबस्तही लावला होता. संतप्त जमावाने केलेल्या हल्ल्यामुळे सोन्या जाधव हा त्याच्या कुटूंबियांसह त्या ठिकाणाहून फरार झाला होता. याच दिवशी या परिसरातील जमावाने त्याचे घर पाडून दहशत निर्माण केल्याप्रकरणी सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चाळीस जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, रविवारी घराची पाहणी करण्यासाठी आलेल्या सोन्या जाधव यास जमावाने पाहिले. नदीच्या परिसरात त्यास घेराव घालून जबर मारहाण केली. या जबर मारहाणीत तो रक्तबंबाळ झाला होता. त्याला तातडीने जिल्हा रूग्णालयात नेले असता उपचारादरम्यान रविवारी रात्री सोन्या जाधवची प्राणज्योत मालवली. चार दिवसांपासून जुन्या वादामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते.
याप्रकरणी संगीता नारायण जाधव (४०) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सदर बाजार पोलीस ठाण्यात २० जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुुळे जिल्हा रुग्णालयासह लोहार मोहल्ला परिसरात तणावपूर्ण परिस्थीती निर्माण झाली होती. या या वादानंतर लोहार मोहल्ल्यात सदर बाजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एडीएसचे यशवंत जाधव, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
पोलिसांचे दुर्लक्ष : बंदोबस्ताही घटना
गेल्या आठवडाभरापासून लोहार मोहल्ला परिसरात दोन गटांमध्ये जुन्या वादातून मोठा वाद उफाळला होता. त्यामुळे परिसरातील शांतता भंग होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. असे असतांना जमावाने एकत्र येऊन १७ वर्ष वयाच्या तरुणाला बेदम मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाल्याने पोलिसांच्या बंदोबस्ता बदल सोमवारी दिवसभर शहरात चर्चा होती.
तीन दिवसांपूर्वीच विक्की जाधव याचे कुटुंब आणि लोहार मोहल्यातील रहिवाश्यांमध्ये तुफान वाद झाला होता. यावेळी रहिवाशी जमावाने आक्रमक होऊन तान्या जाधव आणि त्याच्या काही नातेवाईकांची घरे पाडली होती. यावेळी जाधव याच्या पूर्ण कुटुंबाने पलायन केले होते.
याप्रकरणी जमावाविरुद्ध पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेख मासुम यांच्या फिर्यादीवरून तान्या जाधव, रोहित जाधव, आकाश जाधव या तीन सख्ख्या भावासह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.