विद्युत धक्क्याने युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 01:02 AM2019-10-20T01:02:14+5:302019-10-20T01:02:50+5:30
कपाशी पिकाला पाणी देण्यासाठी विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या एका १९ वर्षीय युवकाचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : कपाशी पिकाला पाणी देण्यासाठी विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या एका १९ वर्षीय युवकाचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को येथे घडली.
शंकर सर्जेराव तळेकर (१९ रा. चांधई एक्को ता. भोकरदन) असे मयत युवकाचे नाव आहे. शंकर तळेकर यांचे कुटूंब गेल्या अनेक वर्षांपासून शेतात घर करून वास्तव्यास आहे. शंकर हा शनिवारी सकाळी कपाशी पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेला होता. शेतातील विद्युत पंप सुरू करीत असताना अचानक विजेचा धक्का बसला. यामध्ये शंकर दूरवर फेकला गेला. काही वेळातच तेथे आलेल्या नातेवाईकांच्या लक्षात ही बाब आली. नातेवाईकांनी जखमी शंकर तळेकर याला तातडीने उपचारासाठी जालना येथील रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर राजूर पोलीस चौकीचे जमादार प्रताप चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी राजूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एका शेतकरी कुटुंबातील कर्त्या युवकाचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला आहे. महावितरणने या घटनेचा पंचनामा करावा, संबंधित शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.