ठरलं... फुले मार्केट आधी कागदावर नंतर प्रत्यक्षात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:40 AM2021-06-16T04:40:14+5:302021-06-16T04:40:14+5:30
ही इमारत व्हावी म्हणून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी त्यांच्या परिने प्रयत्न केले. अनेकांना व्यापारीदेखील भेटले; परंतु तोडगा निघत नव्हता. शेवटी आ. ...
ही इमारत व्हावी म्हणून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी त्यांच्या परिने प्रयत्न केले. अनेकांना व्यापारीदेखील भेटले; परंतु तोडगा निघत नव्हता. शेवटी आ. कैलास गोरंट्याल यांनी यात मध्यस्ती केली. त्यांनी यासाठी दोन प्रस्ताव पालिकेने ठेवले होते. त्यात आधी या जागेवर कशी इमारत होणार, याचा नकाशा काढणे आणि त्या नकाशानुसार दुकांनाचा लिलाव करणे आणि दुसरा प्रस्ताव आधी पालिकेने इमारत बांधणे आणि नंतर त्या दुकानांचा लिलाव करणे, असे विचाराधीन होते. हे दोन्ही प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आले हाेते.
त्यावर नंतर नगर विकास खात्याकडे आधी कागदावर प्रस्तावित इमारतींचा नकाशा काढून ती दुकाने व्यापाऱ्यांकडून डिपॉझिट घेऊन नंतर ही इमारत पूर्ण करण्याचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. जणेकरून पैसाही उभा राहील आणि नंतर दुकाने तयार झाल्यावर कोणती दुकान कोणाची हे निश्चित होईल.
चौकट
आज मंत्रालयात बैठक
महात्मा फुले मार्केटच्या मुद्यावर बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या इमारतीचा मुद्दा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या समोर जाणार असून, मंत्रिमंडळात टोपे यावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे आजच्या निर्णयाकडे सर्व जालनेकरांचे लक्ष लागून राहणार आहे.
चौकट
आ. गोरंट्याल यांचा पुढाकार
जालना येथील महात्मा फुले मार्केटची नूतन इमारत बांधण्यासाठी आ. कैलास गोरंट्याल यांनी दोन पर्याय ठेवले होते. त्यातील नगरविकास विभागाने कागदावर इमारतीचा नकाशा काढून त्या दुकानांचा लिलाव करण्यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळात हा प्रस्ताव ठेवणार असून, त्यावर सकारात्मक निर्णय होऊन लगेचच याचे काम सुरू होईल.
-आ. कैलास गोरंट्याल, जालना