स्कूल बस, रिक्षातून विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:08 AM2018-07-17T01:08:17+5:302018-07-17T01:08:51+5:30
शहर वाहतूक शाखा तसेच रिक्षा, स्कूलबसचालक आणि पालकांची संयुक्त बैठक सोमवारी येथील राष्ट्रीय हिंदी महाविद्यालयात पार पडली. यावेळी अनेक मुद्यांवर चर्चा होऊन रिक्षातून विद्यार्थ्यांची होणाऱ्या वाहतुकीवर पायबंद आणला पाहिजे यावर एकमत झाले आहे. मात्र, यातून रिक्षा चालकांच्या पोटावर पाय देण्याचा वाहतूक शाखेचा हेतू नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहर वाहतूक शाखा तसेच रिक्षा, स्कूलबसचालक आणि पालकांची संयुक्त बैठक सोमवारी येथील राष्ट्रीय हिंदी महाविद्यालयात पार पडली. यावेळी अनेक मुद्यांवर चर्चा होऊन रिक्षातून विद्यार्थ्यांची होणाऱ्या वाहतुकीवर पायबंद आणला पाहिजे यावर एकमत झाले आहे. मात्र, यातून रिक्षा चालकांच्या पोटावर पाय देण्याचा वाहतूक शाखेचा हेतू नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
गेल्या काही महिन्यांमध्ये शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी नव्याने रूजू झालेले वाहतूक शाखेचे निरीक्षक चत्रभुज काकडे यांनी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्या सूचनेवरून या बैठकीचे आयोजन केल्याचे सांगण्यात आले. आजच्या बैठकीत परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक काटकर, मुख्याध्यापिका रिना टंडन, डॉ. कैलास सचदेव यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
या बैठकीत पोलीस निरीक्षक काकडे यांनी सांगितले की, जालना हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. येथे मोठ्या प्रमाणावर लोकांची ये-जा असते. त्यातच आता वाहनांची संख्या पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढली आहे. त्यातच पार्किंगसाठी आवश्यक असणाºया जागाही अपु-या पडत आहेत. यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातच शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा मुद्दा ज्वलंत विषय बनला आहे.
मुलांना शाळेत तसेच शाळेतून घरी सुरक्षितपणे नेताना रिक्षा तसेच स्कूलबस चालकांची मोठी कसरत होते. हे टाळण्यासाठी शिस्त लावणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.यावेळी काटकर यांनी देखील वाहतुकी संदर्भात मार्गदर्शन केले. एका रिक्षातून जेवढे विद्यार्थी व्यवस्थित बसतील तेवढेच न्यावेत असे ते म्हणाले. डॉ. सचदेव यांनी देखील या वाहतूक शाखेच्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच शहरातील वाहतूक व्यवस्थेला सुरळीत करण्यासाठी जालनेकरांनी शिस्त पाळणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पालकांनी देखील यावेळी सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले.