खोके पाठवून लोकप्रतिनिधी पळवणार असाल तर लोकशाही संपली असं जाहीर करा: उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 02:12 PM2022-12-10T14:12:03+5:302022-12-10T14:12:13+5:30
केंद्र सरकार न्याययंत्रणेला आपल्या बुडाखाली घ्यायला बघताहेत.
जालना: आपल्याकडे गुप्त मतदान पद्धत आहे , पण आता तुमचे मत कधी सुरत, थेथून गुवाहाटी, गोवा दिल्ली असे जात आहे. मत कोणाला दिले तरी खोके पाठवून लोकप्रतिनिधी पळवणार असाल, तर लोकशाही संपली असं जाहीर करा, अशी टोकदार टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
जालन्यातील घनसावंगी येथील स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ शहागड संचलित संत रामदास कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उदघाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, आपल्याकडे गुप्त मतदान आहे. मात्र नागरिकांनी दिलेले मत त्यांना तरी माहित आहे का? कुणाकडे जाणार आहे आणि कुठून-कुठ्न जाणार आहे. ट्रॅव्हल एजन्सी सारखं सुरत, गुवाहाटी आणि दिल्ली असे कधी इकडे कधी तिकडे असे मतदान मतदारांपासून गुप्त होऊ लागले आहेत. असे कसे चालणार. अशी लोकशाही आपण मानणार नाही. त्यामुळे लोकशाहीचा अर्थ असा लावणार असेल तर देशातील लोकशाही संपली असे एकदा जाहीर करून टाका. लोकशाही म्हणजे काय तर लोकांनी निवडून दिलेल्या मताची किंमत खोक्यामध्ये होत नाही.
न्यायपालिकेवर ताबा घेण्याचा प्रयत्न
सरकार न्याययंत्रणेला आपल्या बुडाखाली घ्यायला बघताहेत. कायदामंत्री, उपराष्ट्रपती त्यावर बोलताहेत. पण आम्ही बोललो तर अवमानना व्हायला हवेच पण समान कायदा हवा. न्यायमूर्ती पण पंतप्रधान नेमणार असतील तर काय फायदा. पंतप्रधान बोले तो कायदा ही लोकशाही असू शकत नाही. अशी टीका देखील माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.