पिण्याच्या पाण्याची दहा गावांत तीव्र टंचाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:38 AM2018-09-17T00:38:21+5:302018-09-17T00:39:34+5:30
जाफराबाद तालुक्यात गेल्या पावसाळ्यात माहोरा परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने परिसरातील दहा गावांत पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यात गेल्या पावसाळ्यात माहोरा परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने परिसरातील दहा गावांत पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामस्थांना विकतचे पाणी घेऊन पिण्याची वेळ आली आहे.
पाणी पुरवठा करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने पंचायत समिती, पाणी पुरवठा विभाग यांच्याकडे मागणी केली आहे. पाणी टंचाईवर उपाय योजना करण्यासाठी शासनाने १५ टँकर आणि विहीर अधिग्रहण करण्या करता १५ सप्टेंबर २०१८ पर्येंत मुदत वाढ देण्यात आली होती. ही मुदत संपल्याने पिण्याचे पाणी कोठून आणायचे असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. गेल्या महिन्यात रिमझिम पाऊस पडला होता. तेंव्हापासून जाफराबाद तालुक्यात पाऊस पडला नाही. परिसरातील नदी, नाले, तलाव कोरडे ठाक आहेत. परिणामी तालुक्यातील माहोरा, वरुड खुर्द, पिंपळगाव कड, म्हसरुळ, येवता, चिंचखेड या गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे ग्रामस्थांना शेतातील विहिरीवरुन पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. प्रकल्पात पाणी नसल्याने जनावराना पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाअभावी सोयाबीन, कपाशी, मका आदी पिकांना फटका बसला असून उत्पन्नावर परिणाम होण्याची चिंता शेतकरी व्यक्त करीत आहे. पावसाअभावी खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून निघून गेला आहे. शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शासनाने उपाय योजना करण्याची मागणी शेतक-यांनी केली.