आरोपीस दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:51 AM2020-02-18T00:51:41+5:302020-02-18T00:52:12+5:30
एका तीन वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : एका तीन वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच विविध कलमांखाली ३५ हजारांचा दंडही ठोठावला. ही घटना जानेवारी २०१६ मध्ये भोकरदन शहरात घडली होती.
कमलाकर लक्ष्मण ढसाळ (४० रा. भोकरदन) असे आरोपीचे नाव आहे. २० जानेवारी २०१६ रोजी कमलाकर ढसाळ याने शहरातील एका ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला होता. ढसाळ विरूध्द भोकरदन ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासाधिकारी डीवायएसपी ईश्वर वसावे यांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. प्रधान यांच्या समोर झाली. सरकार पक्षाकडून सहायक सरकारी वकील जयश्री सोळंके यांनी काम पाहिले. या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्ष व वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश प्रधान यांनी आरोपी कमलाकर ढसाळ याला कलम ३७६ भादंवि व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याप्रमाणे १० वर्षे सश्रम कारावास व २५ हजारांचा दंड, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कायद्याप्रमाणे १० वर्षे शिक्षा व १० हजार रूपये दंड व दोन वर्षे शिक्षा व २ हजार ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावल्याचे सहायक सरकारी वकील जयश्री सोळंके यांनी सांगितले.
या प्रकरणात फिर्यादी, पीडित मुलगी, तपासिक अंमलदारांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. साक्ष व पुरावे ग्राह्य धरून आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली.