मानव विकास मिशन योजनेचा बोजवारा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:45 AM2018-09-04T00:45:57+5:302018-09-04T00:46:18+5:30
मानव विकास मिशनच्या बसेस नसल्याने अनेकांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे वीज मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ कुंभार पिंपळगाव परिसरातील विद्यार्थ्यांवर ओढावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : मानव विकास मिशनच्या बसेस नसल्याने अनेकांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे वीज मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ कुंभार पिंपळगाव परिसरातील विद्यार्थ्यांवर ओढावली आहे.
घनसावंगी तालुक्यात मुलींच्या शिक्षणासाठी मानव विकास मिशनच्या बसेस बंद करण्यात आल्या, तर काही ठिकाणी बसेस जात नसल्याने मुलींच्या शिक्षणाची हेळसांड होत आहे. एकंदर घनसावंगी तालुक्यात मानव विकास मिशनच्या बसेसची वानवा दिसून येत आहे. ज्या काही बस आहेत, त्या येत नसल्याने अवैध वाहतुकीचा वापर करून टपावरून प्रवास करावा लागत आहे.
कुंभारपिंपळगाव परिसरातील पिंपरखेड बुद्रूक, राजा टाकळी, शिवणगाव, उक्कडगाव, भादली, गुंज, श्रीक्षेत्र जांब समर्थ, देवी दहेगाव, विरे गव्हाण, अरगडे गव्हाण, लिंबी, मूर्ती, ना वाडी, नाथनगर, या ठिकाणी मानव विकासच्या बसेस सुरूच नाहीत तर काही गावात बस येतात परंतु त्यात जागाच शिल्लक नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण कायम आहे.
या ठिकाणी चालू आहे बस
तालुक्यातील काहीच मार्गावर मानव विकास बसेस चालू आहेत त्यात घनसावंगी माहेर जवळा- घनसावंगी, रांजणी- घनसावंगी, घनसावंगी- शेवगा- घनसावंगी ,अंबड -घनसावंगी कुंभार- पिंपळगाव, घनसावंगी- शेवगळ- अंबड, अशा सात मानव विकास अंतर्गत बसेस चालू आहेत.
बस बंद असलेले गावे
राजा टाकळी, पिंपरखेड, गुंज, अंतरवाली टेंभी, मंगरूळ, पारडगाव, लिंबी, मूर्ती, धामणगाव, मासेगाव , भादली, देवी देहिगाव, जांब समर्थ , विरेगाव, आरगडे गव्हाण, पिंपरखेड बुद्रूक या ठिकाणी बसेस नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे ज्यामुळे पालक वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे तर मानव विकास मिशनच्या जास्तीत जास्त बसेस सोडण्याची मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.